गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

नाही तुझा ठाव रं

लंगड़ा तुझा डाव लेका
लंगड़ा तुझा भाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

दान आलं खूप तुला
सोन्याचं मुख रं
देणारा खाई तूप परि
नाही त्याला सुख रं ।

श्रद्धेचा घाली घाव
त्याला पैशाची हाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

नावानं तुझ्या आज
यानं मांडला गोंधळ
पुण्य नाही पाप केलं
यानं होऊन आंधळ ।

झाला वेडा गाव मनी
नाही भक्तीभाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

संजय लिंबाजी बनसोडे

जातीची रगातपीती

बुडला याचा धर्म,
याची जात गेली सती
तरी राह्यली याच्या
डोसक्यामधी भीती ।

नवस,व्रत ,पूजा,भक्ती
हीच याची नीती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

झाली याला कशी,
जातीची रगातपीती
माणसाला झालीया,
माणसाचीच भीती ।

खपली माणुसकी,
जनावर झाली अती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

संजय बनसोडे

विटाळ

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

सर्जिकल स्ट्राइक

भारतीय जवाना प्रमाणे
भारतीय नागरिकांनीही
आता,सर्जिकल स्ट्राइक
करायला पाहीजे........
आणि
इथल्या सत्ताधाऱ्यांना
नेस्तनाबूत करायला पाहीजे.
स्वाईन फ़्लू प्रमाणे
महागाईचा संसर्ग देशाला
आपल्या कचाट्यात
घेत असतांना,
दुसरीकडे गोरक्षकांनी
आणि धर्म रक्षकांनी
दलित,मुस्लिम,पुरोगाम्यांना
संपविण्याचा विडा उचललाय
सत्ताधारी मात्र गप्पच......
शेतकऱ्यांच्या पिकांना
हमीभाव व कर्जमाफ़ी
गुलदस्त्यात ठेऊन
हाई कमांड प्रमाणे
होम कमांडही देशवारी
करतंय......
यांचा विरोध केला
तर आम्ही "साले" झालो
यांच्या विरोधात
आंदोलन केले तर आम्ही
"नकली शेतकरी"झालो
कर्जमाफ़ीसाठी सातत्याने
चकरा मारून ऑनलाईन
अर्ज भरले तर
आमच्या अर्जाची "बोगस अर्ज"
म्हणून मजाक उडवली...
आता बस्स.....
"बाबा, तुझे भीक नको
पण तुझा कुत्रा आवर रे......"
नको आता तुझ्याकडून काही.
कारण,
आता आम्हीही तुमच्या विरोधात
सर्जिकल स्ट्राइक करण्याची
तयारी करीत आहोत......

संजय एल बनसोडे

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

सत्य

सत्य अजून मी जाणले कुठे
देवाला अजून मी मानले कुठे ॥

उपास,व्रत हे वायफळ आहे
खरे समोर मी आणले कुठे  ॥

मठ्ठाधीस, अब्जाधीश झाले
गरीबांना, भक्त गणले कुठे ॥

नवसासाठी जीवहत्या केली
माणूस तुम्ही,  बनले कुठे ॥

नसला जरी ,आहे म्हणती
भक्तीचे नाते ताणले कुठे ॥

संजय एल बनसोडे

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

दिलखुलास

दिलखुलास एकदा जगून बघ
स्वप्न सोडून एकदा रंगून बघ ॥

जन्म आहे तुझा एकदाच मित्रा
स्वतःभोवती एकदा दंगून बघ ॥

पळपळ पळाला आप्तासाठी तु
स्वतःसाठी , एकदा थांबून बघ ॥

सुंदर आहे विश्व सुंदर आहेत लोक
द्वेष, मत्सर एकदा त्यागून बघ ॥

धन मागाशील किती देवासमोर तु
प्रेम , माया एकदा मागून बघ ॥

दिलखुलास एकदा जगून बघ
स्वप्न सोडून एकदा रंगून बघ ॥

संजय एल बनसोडे

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

विकास वेडा झाला

मालाला हमीभाव नाही
कर्जमाफीचं ठाव नाही
आश्वासनांचा पेड़ा झाला
मंत्री, खाऊन रेडा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

फार्म भरता भरता
वर्ष सरुन गेलं
कर्जमाफीचं स्वप्न,
उराशी मरून गेलं
शेतकऱ्यां भोवती आता
उपासमारीचा वेढा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

पेट्रोलचे भाव गगनाला
भीडले
आमचे पीक मात्र भावाविना
किडले
"अभ्यास सुरू आहे.....!"
हा रोजचा धडा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

संजय एल बनसोडे

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

चिमटा

निसर्गा

वाळलं, सारं जळालं,
रौद्ररूप तुझं कळालं
मी तुझाच चाकर
खातो तुझीच भाकर
तरी का ठेवितो अंतर...
का मुकं केलं अंबर 2 ॥
रानी पेटला वणवा
सारी धुराची हवा
इथं उड़ना पाखरू
झाला दिशहीन थवा
मार इन्द्ररूपी मंतर ॥
कणसात नाही दाणा
खिशात नाही आणा
कुपोषित झालं रानं
काय त्याचा रं गुन्हा
शस्त्रांवीना चाले संगरं ॥
उनाड रानी ये एकदा
बोलवू तुला रे कैकदा
गरज असा,बरस असा
मज तृप्त होऊदे सदा
शोध सुकाळी तंतर ॥
संजय एल बनसोडे


संजय बनसोडे 

आरक्षण आरक्षण

आरक्षण आरक्षण
ह्याला पण पाहीजे
त्याला पण पाहीजे
कायद्यात नाही तर
करु नवीन कायदे ।
नौकरी, धंदा,काम
हवं स्वस्त शिक्षण
आरक्षण आरक्षण ॥
कोपर्डी बलाढ्य अन्
खैरलांजी कमकुवत
जातीसाठी न्याय हवा
हीच साऱ्याची नियत ।
बिनशर्त हवे जातीसाठी
नका करू निरीक्षण
आरक्षण आरक्षण ॥
गोर् गरीब तिथेच आहेत
अच्छेदिन मिथ्यच आहे
कुणीही आले सत्तेवर तरी
सारे इथे लूच्चेच आहेत ।
दलित हत्या ढोरावानी
महत्वाचे आता गोरक्षण
आरक्षण आरक्षण ॥
जितका मोठा मोर्चा
तितकी मोठी चर्चा
सत्तेवर बसलेल्यांच्या
हलवतील खुर्च्या ।
न्याय दिला तर ठीक
नाहीतर तुरंत ॲक्शन
आरक्षण आरक्षण ॥

संजय बनसोडे 

पाणी दे पाणी

पीकं करपलं  माझं मन  हरपलं 
ढगातलं पाणी इथं नाही बरसलं 
भेगाळल्या रानात 
जाळणाऱ्या उन्हात 
सांगे मन माझं गऱ्हाणी.........
तहानलेल्या रानी,पाणी दे पाणी ॥

नाही ढोरा चारा,पिसाटला वारा
थांबलेल्या ढगा, दे थोडा थारा
कडाडू दे थोडा 
वाहू दे रं ओढा 
झुळझुळ मंजुळ  ऐकू दे कानी 
तहानलेल्या रानी,पाणी दे पाणी ॥

दिलासं तू घावं तुझं सांगू कुणा नाव 
पाण्यावीना कासावीसं,रान माळ गाव
येरे पुन्हा परतूनी 
तृप्त कर बरसूनी 
येऊ दे मुखी माझ्या सुखाची गाणी 
तहानलेल्या रानी, पाणी दे पाणी ॥

संजय बनसोडे

दुःख आलं डोईवरी

रातीला भित नाही गडद अंधारं 
इखाला पीत नाही माणूस झुंजारं  ।

हरपलं सुख, पोटं मागे भाकरी....
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥

करपल्या रानाचा काय भरवसा ठेउ 
उदरात नाही माझ्या, तुला काय देऊ ।

रातदिस उपाशी मी करितो चाकरी
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥

मन धावे सैरावैरा भेटना विसावा
दारिद्री कलंक कुणी त्याचा रं पुसावा । 

शिवना त्याला ते सुख अहंकारी
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥


संजय एल बनसोडे

नास्तिक विचार

कुजक्या संस्कृतीशी पुन्हा भांडतो मी 
नास्तिकी विचारा नव्याने मांडतो मी ॥

सोडून जात धर्म माणूस आज झालो 
अंधश्रद्धा तुझी ती नव्याने कांडतो मी ॥

भरला मी नव्याने डोक्यात विवेक माझ्या
तुझा देव अन् धर्म नव्याने सांडतो मी ॥

दगडाच्या देवाला पूजने केले मी बंद 
माणसातच आता खरा देव ढूंडतो मी ॥

काय सांगू संजया दशा माणवाची
खरे सांगून त्याशी खोटे उंडतो मी ॥

कुजक्या संस्कृतीशी पुन्हा भांडतो मी 
नास्तिकी विचारा नव्याने मांडतो मी ॥


संजय  बनसोडे

विझली मशाल पेटव

विझली मशाल पेटव रण  पुरोगामी  उठव
फुले  शाहू  आंबेडकर कार्य त्यांचे मनी आठव विझली मशाल पेटव !!

प्रेम ठेव मनी कर समतेची पेरणी एकीची कर करनी एकतावाद जगी उठव
विझली मशाल पेटव !!

शीलाचा तू शीलदार शिवबांचा करजदार भिवाचा वारसदार लेखणी पुन्हां उमटव विझली मशाल पेटव !!

बुद्ध कबीर आणी फुले त्यामुळे माणुसकी डोले संजय ही मनी बोले पुन्हां विचार त्यांचे आठव
विझली मशाल पेटव !! 

संजय बनसोडे

विषय गणपतीचा नाहीच....

पूर्वीपासुनच या देशात दोन विचारधारा चालत आल्या आहेत.एक आहे देवाचे अस्तित्व मानणारी आणि दूसरी आहे देवाच्या अस्तित्व न मानणारी. साहजिकच देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांचा पाया हजारो वर्षापासून भक्कम आहे...तर देवाचे अस्तित्व न मानणारी नास्तिक विचारधारा आजपर्यंत या सनातनी पूराच्या प्रवाहात शाबूत ठेवण्याचे काम त्या त्या काळातल्या महापुरुषाने केले आहे.चार्वाक, बुद्ध , व्हाया फुले आंबेडकरांमार्फत ही विचारधारा इथपर्यंत आली आहे..देव आला की कर्मकांड आले. अंधश्रद्धा आली..धर्म,जात,पंत आला आणि त्या सोबत धर्म कट्टरता आली.दुसऱ्या धर्माच्या देवांविरुद्ध द्वेष आला.
पूर्वी कधी नाही तितकी वैचारिक सुधारणा आपल्या महाराष्ट्रात या नऊ दहा वर्षात झाली आहे.आणि ही सुधारणा फक्त एकाच धर्मात किंवा एकाच जातीपुरती मर्यादित नव्हती..आज मुस्लिम समाजही आपल्या धर्मातील अनिष्ट रुढी विषयी आवाज उठवताना दिसत आहे..हिंदू, बौद्ध धर्मातही हे बदलाचे वारे तीव्र गतीने वाहताना दिसत आहे..हिंदू धर्मातून विवेकी पद्धतीने अंधश्रद्धा दूर करून समाजाला डोळस करण्याचे काम "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" सारख्या संघटनेने केले आहे. तर हजारोवर्षापासून गरीब, शेतकऱ्यांना लुटून एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मणी पूजापाठ पासून समाजाला डोळस करण्याचे काम "संभाजी ब्रिगेट" सारख्या संघटनेनी केले आहे..
आज हिंदू समाजातही ज्यांनी रुढी परंपरा नाकारुन पुरोगामीत्व स्वीकारले असे आपल्या घरात गणपती बसवत नाहीत गुढी पाडवा साजरा करत नाहीत. पण बौद्ध समाजात एक दोघांनी गणपती बसवला व बौद्ध तरुणांनी त्यांना तिथे जावून खडसावले आणि महाराष्ट्रभर उलट सुलट चर्चेचा ऊत आला....
जगताप कुटुंबीय म्हणाले की आम्ही नवस बोललो होतो व तो पूर्ण झाला म्हणून आम्ही गणपती बसवला. जगताप कुटुंबीयांच्या डोक्यात जी ढासुन अंधश्रद्धा भरली ती याला कारणीभूत आहे.त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून ते कृत्य त्यांनी केले. त्याला खऱ्या प्रबोधनाची गरज आहे. नवस वैगेरे हे फक्त थोतांड आहे. बाबासाहेब आणि बुद्धाच्या विचाराचे दाखले देऊन समाज बांधवानी त्याचे प्रबोधन करायला हवे पण तसे न करता त्याच्या घरचा वीडियो सोशियल मीडियावर वायरल करून जगताप कुटुंबीयाची बदनामी करण्याचे काम केले व काही न्यूज़ पेपरने त्याला गद्दार घोषित करून त्याच्या मोबाईल नंबर सहित त्यांच्या कारनाम्याची बातमी फ्रंट पेजला छापली.
एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचा प्रिय असलेला गणपती बसवला म्हणून बौद्ध समाज आपल्याच समाज बांधवाना गद्दार घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत आहे त्यामुळे विरोधकाच्या हाती आयतेच कोलीत आले व, मानवतावाद व समता सांगणाऱ्या बौद्ध धम्मात बौद्ध तालिबानी बनत आहेत. असा त्यांनी समाचार घेतला...आज सोशियल मीडियावर एक अशी फळी निर्माण झाली आहे त्यात फक्त बौद्धच नाही तर हिंदू समाज बांधवही भरपूर आहेत ज्यांनी पुरोगामी विचारधारेचा स्वीकार केला ते आज हिंदू धर्माच्या अनिष्ट रुढी परंपरेवर टीका करतात.गणपती का बसवू नये हे पूर्वीच्या विचारवंताचे दाखले देऊन सांगतात....बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना फाटा देत जगताप कुटुंबीयांनी मुद्दामहून गणपती बसवला नाही तर त्यांचे प्रबोधन न झाल्याने अंधश्रद्धा कारणीभूत ठरली. समाजप्रबोधन हे चार भिंतीच्या आत व्हायला पाहीजे.जे बाबासाहेब जातीअंतासाठी लढले, त्यांचेच नाव घेऊन जर आपण जातिवाद पसरवत असाल तर नक्कीच इतर धर्मीयांचा बाबासाहेब आणि बौद्ध धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वतच्या देवांवर व संस्कृती वर जर इतर धर्मीय टीका, टिप्पणी करीत असेल तर भावना दुखावल्या जाणारच. जेंव्हा आपण ह्या सर्वे पोस्ट (भाऊ कदम,जगताप कुटुंबीय,हिंगोलीचे शिक्षक) सोशियल मीडियावर वायरल करीत होतो तेंव्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या हे साहजिकच आहे...समोरच्याला विचारांनी पराजित करावे हीच आंबेडकरी शिकवण आहे आणि ती आपण जोपासलीच पाहीजे.
आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस इतर धर्मात झपाट्याने वाढत आहे आणि अश्यात आपण बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीत बांधण्याचा प्रयत्न कराल तर भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न फोल ठरेल..आंबेडकरी विचारधारा आज सर्वच समाज स्वीकारतांना दिसत आहे. कुणाच्या भावना दुखवून समाजप्रबोधन होत नाही. समाजप्रबोधन हे इंजेक्शना प्रमाणे झाले पाहीजे. समोरच्याला वेदनाही जाणवल्या नाही पाहीजे आणि त्याचा रोगही बरा झाला पाहीजे.....
मनोगत................
संजय एल बनसोडे
9819444028

तुह्या देशात माणुसकी नाय रं

सत्यावरी करी असत्य घाव रं 
विषमतेचं मुखी नित्य नाव रं 
खेळ ईखारी मौत तुझा डाव रं ॥

रडे धाय धाय   माझी माय रं 
तुह्या देशात माणुसकी नाय रं ॥

बिथरलं सारं , लेखणी आधार
कैद केलं तिला खुपसुन हत्यार 
तरी ना घेतली आम्ही माघार ॥

वैरी माणसं, आप्त तुझी गाय रं 
तूह्या देशात माणुसकी नाय रं ॥

थांबविन आम्ही तुझ्या रं गोळीला
संपविन आता तुझ्या त्या टोळीला
नको विसरू,संजयाच्या ओळीला ॥

उद्याचा दिस आमचाच हाय रं 
तुह्या देशात माणुसकी नाय रं ॥

संजय एल बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...