*धम्मचक्र परिवर्तन दिनांनिमित्त भीम लेखणी विचारपीठवर घेतलेल्या लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर*
निकाल जाहीर व्हायला थोडा अवधी लागला त्याबद्दल क्षमस्व 🙏🏻
दिनांक 11/10/ 2016 रोजी भीम लेखणी विचारपीठवर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लेखनस्पर्धा घेतली होती.
विषय होता *आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो का ?*
या स्पर्धेत सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला.त्याबद्दल सर्वांचे आभार. खरे तर सर्व स्पर्धकांनी वेळात वेळ काढून अत्यंत मेहनतीने या विषयावर त्यांच्या विचारांची मांडणी केली. त्यामुळे कोण प्रथम आणि कोण द्वितीय हा विषय महत्वाचा नसून आपण हाती घेतलेली भीम विचारांची लेखणी महत्वाची आहे.
आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो का ? या विषयांवर लिहताना संघरत्न घनघाव म्हणतात,
आपल्याला आज बौद्ध धम्माच्या पंगतीत बसून साठ वर्षे झाले.हा साठ वर्षाचा प्रवास,खरोखरच आपण बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार केला असता तर आज आपल्याला आपल्या धम्म बांधवाचे असे समाजप्रबोधन करायला लागले नसते आणि आतपर्यंत आपल्या समाजातून हिंदू चालीरीतीचा पगडा पूर्णपणे संपलेला असता.पण तसे प्रत्यक्षात झाले नाही आणि धर्मांतर होऊन साठ वर्षानंतरही आजचे बौद्ध, धम्मा विषयी तळ्यात मळ्यात आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानवादी धम्म दिला पण आपण त्यात चुकीच्या चालीरीती घुसवत आहोत. आजही आपल्यात मूल जन्मास आले तर आपण, त्या स्त्रीची ओटी भरणे,पाचवी,बारवी,बारसे करणे, काळे दोरे गंडे बांधणे, काळा टीक्का लावणे इत्यांदी आजही हिंदू चालीरीतीच आपण वापरतो.
हिंदू धर्मीय सत्यनारायण घालून वास्तू शांती करतात आणि आपण गृह प्रवेश, यात फरक काय ? आपण फक्त विधीचे पर्याय बदलले.
आपल्यात धम्मचक्र परिवर्तन दिनांनिमित्तही वाद आहेत की तो हिंदूच्या तिथीला करायचा की इंग्रजी कॅलेंडर नुसार ?
या सर्व विषयावरून संघरत्न घनघाव सरांचे म्हणणे हेच आहे की, आपण फक्त बौद्ध धम्म स्वीकारला पण आत्मसात केला नाही.
सुकेशनी विमल दिगंबर कदम ताई लिहतात,
बाबासाहेबांनी फक्त धर्मांतरच केले नाही तर त्या धर्मांतरच्या कित्येक वर्षे अगोदर सिंह गर्जना केली होती की, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही. का केली ही सिंह गर्जना ? कारण बाबासाहेबांना फक्त धर्मांतरच करायचे नव्हते तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या अन्यायकारक प्रथांना व वर्णव्यवस्थेला फाटा द्यायचा होता.वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरा समजातून काढून फेकून द्यायच्या होत्या. म्हणूनच त्यांनी ही सिंह गर्जना केली होती.बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर, बौद्ध धम्म आपल्याला बहाल केला जेणेकरून त्या धम्मात माझे बांधव माणूस म्हणून संचार करतील. पण आपण बौद्ध धम्माचे पालन न करता त्या बौद्ध धम्माची राखरांगोळी केली. स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या आणि हिंदू धर्मांचे ढासुन पालन करणाऱ्या काही त्यांनी मैत्रिणीचे उदाहरण दिले. नवरात्रीत एक बौद्ध असलेली मैत्रीण नवनवीन साड्या घालून भाग घेत होती तर दूसरी मैत्रीण चक्क बिना चप्पलची फिरत होती त्यांनी त्या मैत्रिणीला विचारले असता तिने सांगितले की, माझ्या सासरी फक्त उपवासच धरतात माझ्या माहेरी तर गणपती ही बसवतात. हे सारे ऐकून ताईला हसावं की रडावं हेच कळत नव्हते कारण, 22 प्रतिज्ञेची आणि बौद्ध धम्माची त्यांनी वाट लावली होती. रागाने ताईनी शेवटी त्यांना पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला.
खरे तर बौद्ध धम्मात अशा लोकांची फार दयनीय अवस्था झाली.धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. गाढवाला सोन्याचा जरी महाल बांधून दिला तरी ते गटारातच लोळण्यात धन्यता मानतात. अशीच काही अवस्था ह्या लोकांची झाली जे बौद्ध आहेत पण बौद्ध धम्माचे पालन करीत नाहीत.हा दिवस पाहण्यासाठी बाबासाहेबांनी आपले धम्मपरिवर्तन केले का ? .पण या गाढवाना कसे कळेल ?
मी खूप रागीट आहे.असे माझ्या कुंडलीतच लिहले असेही म्हणणारे ही खूप बौद्ध आहेत.हे असली लोकं पाहिली की वाटतं उगाच खटाटोप करून बाबांनी यांना बौद्ध धम्म दिला. काही बोटावर मोजता येणारी माणसं सोडली तर बाकीच्यांची लायकी आहे का ?
सुकेशनी ताईच्या लेखावरूनही असेच वाटते की आपण ते बौद्ध अजून बनलो नाही जे बाबासाहेब आपल्याला बनवण्याचा प्रयत्न करीत होते.
विश्वनाथ साठे सर आपल्या लेखात लिहतात,
साठे सरांनी आपल्या लेखात बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा पैकी 14-15-16-17-18 ह्या प्रतिज्ञावर सखोल चर्चा केली.
14-मी चोरी करणार नाही.
15-मी व्यभिचार करणार नाही
16-मी खोटे बोलणार नाही
17-मी दारू पिणार नाही
18-प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यथित करीन.
खरे तर आपण 22 प्रतिज्ञा पैकी ह्या 5 प्रतिज्ञा आत्मसात कराव्या हा विचार आपल्या मनाला शिवत सुध्दा नाही.पण साठे सर म्हणतात की, आपण आजवर सतरा प्रतिज्ञा पाळत आलो आहे पण खऱ्या दैनंदिन जीवनात अनुसरण्याच्या ह्याच प्रतिज्ञा आहेत ज्या तुम्हांला खरा माणूस बनण्यात मदत करतील.जो धर्म माणसाला माणुसकीचे वर्तन शिकवते तोच आमचा धर्म आणि हीच माणुसकी बुद्धानी कैक वर्षापूर्वी अनुसरली होती. साठे सरांच्या मते खरा बुद्धाचा धम्म तर याच पाच प्रतिज्ञेमधे आहे. आणि स्वतः धम्मपुत्र मानणारी किती जनता या प्रतिज्ञेचे.अनुसरण करायला तयार आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म व ह्या प्रतिज्ञा दिल्या त्याच बाबासाहेबांच्या जयंतीत आपण DJ च्या तालावर दारू पिऊन नाचतो.यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी काय असणार ?
प्रज्ञा शील करुणा अंगिकारून त्रिफळाच्या गुलामीला नभात घालवून लावणारी विचार क्षमता आम्ही हरवीत चाललोय काय असा प्रश्न उपस्थित होतो.
साठे सरांच्या मतानुसार ही आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालोच नाही असेच भाकित होते.
अमोल खडसे सर आपल्या लेखात लिहतात,
आपण हिंदूच्या 33 कोटी देवांना मानण्याऐवजी फक्त 22 प्रतिज्ञेचे नियमानुसार पालन करून जगण्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा. जे आज हिंदू महार म्हणून जगत असतील त्याला समाजात राहण्याचा काहीच अधिकार नाही.कारण,हेच लोक येणाऱ्या पिढीला बुद्धिस्ट होऊ देणार नाहीत.
समाजावर अत्याचार करणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना अनुसरून खडसे सर म्हणतात, आमच्यावर आजही अन्याय अत्याचार चालू आहे.कारण, आम्हांला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला म्हणून आम्ही तलवारी बाजूला ठेवल्या आहेत.पण तुम्ही असे समजू नका की आम्ही तलवारी चालवण्याचे विसरलो आहोत. कारण आजही आम्ही 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जावून अभिमानाने तिथली माती कपाळी लावतो.
माझे वय चोवीस आहे तरीही अजून मी कुणाला मतदान केले नाही कारण, आमच्या मतांवर निवडून आमच्याच वस्त्यावर हल्ले करणारे मी बघितले. खडसे सर सर्व आंबेडकरी नेत्यांना एक होण्यासाठी विनंती करतात व शासनकर्ता जमात होण्यासाठी व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना आव्हान करतात.
प्रशिक चंदाबाई गनवीर सर लिहतात,
आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो नाही. कारण, बाबासाहेबांना जेंव्हा समाजाची परिस्थिती बदलायची होती तेंव्हा त्यांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्म स्वीकारला.कारण, त्यांना बौद्ध धम्मात कुठल्याच अनिष्ट चालीरीती,कर्मकांड,उचनीच दिसली नाही.म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकार केला. पण आज आपण काय करतो, गणवीर सरांच्या मते आजही आपण कर्मकांडात अडकलो आहे.भीतीपोटी का होईना पण आपण दगडापुढ माथा टेकतोच.
आणि जे स्वतःला कट्टर बौद्ध समजतात ते तरी काय करतात कर्मकांडच फक्त त्यांची कर्मकांड करण्याची पद्धत ब्राह्मणापेक्षा वेगळी आहे. जसे ब्राह्मण संस्कृतमधे मंत्र बोलतो तसेच आपण पाली भाषेत बोलतो पण त्याचे आचरण करत नाही त्यामुळे ते व्यर्थच.
बाबासाहेबांनी सांगितले की, माझा जयजयकार करू नका तर माझी चळवळ पुढे न्या पण आपण त्यांचा जयजयकार करण्यातच गुंतलो.आपल्याला बाबासाहेबांचा भक्त बनून नाही तर अनुयायी बनून कार्य करावे लागेल तरच आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध बनू अन्यथा नाही.
चंद्रशेखर भारती लिहतात,
बाबासाहेबानी गावातले महारवाडे बंद करण्याची अपेक्षा होती पण दुःखाची बाब ही की, साठ वर्षानंतर ही महारवाडे आणि त्यांच्या वस्त्यावर फूस्स फूस्सणारा जातिवादी नाग अजून जिवंत आहे. राज्यघटनेने जरी आपल्याला समतेचे तत्व बहाल केले तरी ते अजून पुस्तकातच बंदिस्त आहे.ते प्रत्यक्षात मात्र उतरलेलच नाही.
आज सुधारलेला समाज मागास असलेल्या बांधवाकडे ढुंकूनही बघत नाही त्यामुळे सर्वात जास्त समाजाच्या प्रगतीला बांधा येते.
आमचे राजकीय ही अंध:पतन झाले rpi चे अनेक तुकडे होऊन वेगवेगळ्या पक्षांशी स्वतःच्या फायद्यासाठी हातमिळवणी केल्यामुळे आम्ही आमच्यावर अन्याय झाला तर सरकारवर दबाव ही आणू शकत नाही.
धार्मिक बाबतीत ही तसेच धम्माचा प्रचार करणाऱ्या अनेक संस्था आहेत पण त्यांचे आपसातच मतभेद आहेत.
दर रविवारी विहारात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही.आम्ही आमच्या समाजाचे वृतपत्र वाचण्याऐवजी प्रतिष्ठित वृत्तपत्र वाचण्यात धन्यता मानतो.
बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ दिला तो आम्ही वाचण्याऐवजी घरात एकाद्या कपाटात धूळ खात पडलेला दिसतो.
22 प्रतिज्ञेच्या चिंध्या करून आम्ही स्वतःच बाबासाहेब झालो.
आपण आज सामाजिक व धार्मीक बाबतीत दुभंगलो आहोत याचे कारण आमच्या पुढाऱ्याने बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा सोयीनुसार लावलेला अर्थ होय.
आम्ही शिकलो संघटित झालो पण गट गटाने.
आम्ही बाबासाहेबांच्या परीक्षेत नापासच झालो आहोत.
विजय तारा नामदेव सर लिहतात,
आपण बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे बौद्ध झालेलो नाही.
आपण एकमेकाच्या ऊनीवा काढण्यातच वेळ वाया घालवतो.पुस्तकी ज्ञान घेऊन वाटेल त्या विषयावर वाटेल ते बोलतो. हिंदू चालीरीतीना प्रथाना नावे ठेवणे सतत चालू असते.आपण आपल्या धम्माचा प्रचार करण्याऐवजी दुसऱ्या धर्माला जास्त लक्ष का बनवतो ? दुसऱ्याचे वाईट बोलतांना आपण आपले चांगले कधी बोलतच नाही. जरी संगीतले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असते.आपण हे बदलायला हवे व धम्म प्रचारावर जास्त जोर द्यायला हवा.
इतरांच्या धर्मात काय वाईट काय चांगले याकडे लक्ष न देता आपण आपल्या धम्माचा अभ्यास करून तो समाजापर्यंत पोचवण्याचे काम करावे.आपण आपला पवित्र धम्म आचरणात आणूया व बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध बनूया.
रविंद्र कांबळे सर लिहतात,
आपण अजूनही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो नाही कारण सर्वात प्रथम समाजाला नावे ठेवण्याआधी आपण समाजाप्रती किती एकनिष्ठ आहोत याचे स्वतःच स्वतः चे अनुकरण केले पाहिजे.
कारण,नुसते फ़ेसबुक आणि व्हाट्सपवर रक्त उसळून चालणार नाही तर विहारी गेल्याशिवाय धम्माचा प्रचार होणार नाही.
गाव सोडून शहरात आलेला व्यक्ति स्वतः बौद्ध म्हणून घेत नाही इतकेच काय तर त्याला जय भीम म्हणायची सुद्धा लाज वाटते.विहारात कधी ढुंकूनही बघत नाही अशा परिस्थितीत त्याला व त्याच्या कुटुंबाला धम्म कळेल कसा ?
जर आपण विहारात गेलो नाही तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध कधीच बनू शकणार नाही.
(टिप : स्पर्धेसाठी लिहलेले लेख खूप मोठे आहेत मी फक्त काही महत्वाचे मुद्देच इथे लिहले आहेत )
स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
*प्रथम विजेता*
चंद्रशेखर भारती
*द्वितीय विजेता*
1) विजय तारा नामदेव
2) रविंद्र कांबळे
*तृतीय विजेता*
सुकेशनी विमल दिगंबर कदम
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
लवकरच सन्मानपत्र आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्ट करण्यात येतील.
*भीम लेखणी विचारपीठ*