मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

सावधान ! हा प्रवास जीवघेणा आहे

मुम्बईची लाइफलाईन समजल्या जाणाऱ्या मुबई लोकलचा मीही एक साधारण प्रवाशी आहे.खरे तर मुम्बईचे धगधगते जीवन हे घड़ीच्या काट्यावरच चालते. सकाळी सहाचा अलार्म वाजला की साखर झोपेतूनही ताड़कन  जागे व्हायचे.आंघोळ करायची मुलांना शाळेत सोडायचे तोपर्यंत बघता बघता आठ वाजतात. आठ वाजले की संपले. आता मात्र डब्बा तयार असो वा नसो घरातून बाहेर पडावेच लागे. कारण कुठल्याही  हालतमधे घणसोली स्टेशन वरून 8:15 ची वाशी लोकल पकडावीच लागे नाहीतर सारा टाईमाचा बट्याबोळ झाला म्हणून समजा.
घणसोली वरून 8:15 पकडली की वाशी वरून cst जाणारी  8:36 ची मिळणार. ती कुर्ला स्टेशनला 9:10 ला पोचणार.तेथून दांडी यात्रा करीत करीत 9:30 ला ऑफीस.हा रोजचा माझा क्रम.
असाच एक दिवस घाई घाईत घरून निघालो घणसोली वरून गाडी पकडली.वाशी स्टेशनला आलो आणि रोजच्या सारखा मोहळावर एकमेकास मधमाशा चिटकतात तसा मीही वाशी स्टेशनवर बायका, माणसांच्या अलोट गर्दीत सामील झालो. काही मिनिटातच गाडी आली.ऑलरेडी गाडी प्रवाशांनी भरगच्च भरून आलेली त्यातले थोडेफार वाशीला उतरले काही उतरण्याच्या प्रयत्नात होते तोच त्यांनाही पुन्हा आत घेऊन वाशीतले प्रवासी चढले त्यांच्याबरोबर मीही चढलो पण आज थोडा चढ़ताना घोळ झाला आणि मला आत शिरायला जमलेच नाही त्यामुळे मी दरवाज्याच्या मधल्या दांडकाला पकडून आत धक्का देत देत उतरू का जाऊ या विचारात असतांना गाडी फलाट फॉम वरून कधी निघाली ते कळलेही नाही.आता मात्र माझी फार गोची झाली भरगच्च गर्दी आणि त्यात माझे अर्धे पाय दरवाज्यात आणि दांडक्याला पकडलेले माझे हात या व्यतिरिक्त माझे सारे अंग लोकलच्या बाहेर होते.आतल्या गर्दीला कितीही ताकतीने धक्का देण्याचा प्रयत्न केला तरी ते तीळभर ही आत न  जाता उलट थोडे थोडे बाहेरच येत होते. गाडी जशी स्पीड घेत होती तसे मला मृत्युचे द्वार दिसत होते. मी लटकलेल्या अवस्थेत बेंबीच्या देठापासून आतल्या प्रवाशांना ओरडत होतो. "ये.....चला रे आत ....मी संपूर्ण बाहेर लटकलोय चला आत ....." पण, प्रवाशांने भरगच्च भरलेली ट्रेन आणि रोजची सवय झालेल्या त्या निष्ठुर लोकांवर माझ्या ओरडण्याचा काहीएक परिणाम होत नव्हता.कसा होणार, जर मी आत असतो आणि कुणी लटकलेले ओरडत असते तर मीही जाग्यावरून हललो नसतो.ट्रेनमधे चढल्यावर  लटकलेल्या प्रवाशांचे माझ्यासारखे रोजचे ओरडणे होते पण आज फरक हा होता की, ओरडणारा मी होतो आणि ऐकणारे रोजचे प्रवासी.
स्टेशनवरून गाडी निघून तीन मिनीटे पूर्ण झाली होती आणि मानखुर्द स्टेशन यायला आणखी सहा सात मिनिटे बाकी होते पण ते सहा सात मिनीटे मला महिन्यासारखे भासत होते. माझे हात गळून आले होते. प्रवाशांना आत दाबून दाबून माझे पाय आणि कंबर गळून गेली होती.कधीही हात सुटून मी खाली पडणार अशी भीती वाटत होती. मृत्यु माझ्या समोर आ वासुन उभा होता. तो माझा हात सूटन्याची  वाटच बघत होता. मी माझ्या समोरच्या व्यक्तीला रडक्या आवाजात विनंती केली " थोडा धक्का मारा हो आत मी खूप बाहेर लटकलो " तो  रागाने चढ्या आवाजात म्हणाला." आत जागा दिसते का तुला ? मला काय खाज  आहे का बाहेर लटकायची ?" आता माझे अंग पूर्ण जाम झाले होते.हाताची तर वाटच लागली होती मी दांड्याला पकडले की नाही हेही कळत नव्हते पण जसे जसे मानखुर्द स्टेशन जवळ येत होते तशी तशी माझी हिम्मत वाढत होती. शेवटी मी तग धरून कसातरी मानखुर्द स्टेशनला पोचलो आणि थोडी जागा झाल्यावर आत शिरलो तेंव्हा कुठे  जिवात जीव आला.
तेव्हापासून मी ठरवले, जर ट्रेनमधे आत घुसायला मिळाले तरच त्या ट्रेनमधे घुसायचे नाहीतर तीन चार ट्रेन सूटल्या तरी चालेल पण रिस्क घ्यायची नाही. सर्वात अनमोल काही असेल तर तो आहे आपला जीव.

त्यामुळे मित्रांनो मी तुम्हांला विनंती करतो की, आपण ही मुम्बई लोकलचा प्रवास करीत असाल तर, *सावधान ! हा प्रवास जीवघेणा आहे.* कारण जानेवरी ते आतपर्यंत फक्त पनवेल ते cst या हार्बर लाईनवर  ज्या लाईनने मी रोज प्रवास करतो त्या लाईनवर माझ्यासारखे आपल्या नोकरीवर वेळेवर जाण्याच्या घाईत 156 प्रवाशांनी आपले जीव गमावले. एखाद्या दिवशी जर कामावर उशीरा गेले तर तुमचा बॉस तुम्हांला नोकरीवरून काढणार नाही. जरी काढले तरी उदया दूसरी नोकरी मिळेल "सर सलामत तो पगड़ी पच्चास" जर तुम्ही ऑफीसमधे वेळेवर पोचण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असाल तर एकवेळ आपल्या कुटुंबाचा ही विचार नक्की करा.

संजय बनसोडे 9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...