डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आँक्टोबर 1956 साली आपल्या लाखो अनुयाया सोबत धर्मांतर केले त्या दिवशी योगायोगाने हिंदू तिथीनुसार येणारा दसरा होता.
दसरा हा शुभ दिवस आहे या दिवशी चांगल्या गोष्टी कराव्यात असा शेकडो वर्षापासून आपल्या समाजात गैरसमज आहे.त्यामुळे आजही आपल्या समाजात धम्मचक्र परिवर्तन दिन हा 14- आँक्टोबरला न होता तिथीनुसार दसऱ्यालाच साजरा होतो. त्यामुळे आजही बौद्ध समाज हिंदू तिथीनुसारच सण साजरे करतात या सत्याला कुणी नाकारू शकत नाही.
हिंदू महार जातीची कात टाकून आपण बौद्ध धम्मात विलीन झालो आणि हा बौद्ध धम्म देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हांला पूजनीय झाले. त्यानीच आम्हांला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकार दिला. त्यांनीच आम्हांला आम्ही माणूस आहे याची जाण करून दिली.गावकूसाबाहेरच्या मुर्दाड महाराच्या डोक्यात नवसंजीवनी घालून माणूस करणारे तेच.अंधश्रद्धेतून, चातुर्वर्णातून आम्हा मुक्त करणारे तेच, त्यांच्यामुळेच आमची या भारत देशात एक नवीन ओळख झाली.
त्यांनी केलेले कार्यच आम्ही उत्सव म्हणून साजरे करतो. महार समाजासाठी त्यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे धर्मांतर. चातुर्वर्णाच्या उतरंडीतून बाहेर काढून आम्हांला बौद्ध धम्म देतांना त्यांनी 22 प्रतिज्ञाही दिल्या त्यातील 21 वी प्रतिज्ञा अशी आहे की, "माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो " म्हणजेच यापूर्वी मी ज्या देवाला मानत होतो, ज्या तिथीनुसार कार्य करीत होतो, ज्या देवाची पूजा करीत होतो, फक्त शास्त्रात लिहले म्हणून जी अंधश्रद्धा पाळत होतो.या सर्वांचा मी त्याग करून एका नवीन धर्मात एका नव्या रूपात वावरीन.
आपण असे न करता आपण हिंदू सणाची आणि बौद्ध धम्माची सांगड घातली आहे. आम्ही 14 एप्रिल जशी धुमधडाक्यात साजरी करतो तशीच दिवाळीही धुमधडाक्यात साजरी करतो. त्यामुळेच धम्मचक्र परिवर्तन दिन हा आपण 14 आँक्टोबरला नाही तर दसऱ्यालाच साजरा करतो.
जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर केल्यानंतर अजून तीन चार वर्षे जगले असते तर त्यांनी धम्मचक्र परिवर्तन दिन हा दसऱ्याला साजरा केला असता का ?
माझ्या मते तर अजिबात नाही.त्यांनी धम्मचक्र परिवर्तन दिन हा 14-आँक्टोबरलाच साजरा केला असता. माझ्या मते तर दसरा आणि धम्मपरिवर्तन दिवस हा केवळ योगायोग आहे.
मी हे यासाठी बोलतो की, अगोदर बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी 5-जून -1956 हा दिवस निवडला होता आणि घोषित ही केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती की, धर्मांतराच्या दिवशी माझ्या समाजाच्या हाती मी लिहलेले "बुद्ध आणि त्याचा धम्म " यावे, जेणेकरून माझ्या समाजाला हा धम्म नीट समजावा व बौद्ध धम्माची त्यांना नीट ओळख व्हावी. पण काही कारणामुळे हे पुस्तक 5 जूनपर्यंत तयार होऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांनी पुढची तारीख ठेवली अशा अनेक तारखा बदलत गेल्या शेवटी आर्थिक अडचणीमुळे शेवटपर्यंत पुस्तक बनलेच नाही शेवटी पुस्तकाविनाच 14-आँक्टोबर-1956 साली धर्मांतर निश्चित केले.
आपल्या घरात एखादे मोठे कार्य घडते तो दिवस आपण तिथीनुसार नाही तर इंग्रजी कॅलेंडर नुसार साजरा करतो.
आपण 14 एप्रिल इंग्रजी कॅलेंडर नुसार साजरी करतो 6 डिसेंबर इंग्रजी कॅलेंडर नुसार साजरा करतो. मंग 14 आँक्टोबर तिथीनुसार का ?
थोडा विचार करा आणि धम्मचक्र परिवर्तन दिन हा 14 आँक्टोबरलाच साजरा करा.
जय भीम
संजय बनसोडे
9819444028
http://bhimlekhani.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा