बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

जातिवादी विंचू

जातिवादी विंचू

समतेचा दगड हाताळतांना
त्या खाली दडलेल्या
जातिवादी विंचवाने मला डंक मारला
कदाचित ते त्याला पसंद पडले नसावे ?
त्याच्या डंकाने प्रचंड वेदना होत होत्या.
त्या वेदनेच्या अतिसाराने मी विवळत होतो.
त्याचे विष हळूहळू वर चढत होते
तशी वेदना तिच्या कह्यात मला आलिंगत होती.
शरीरात चढ़णाऱ्या विषाला ताबडतोब वैद्याचा उतारा  हवा होता.
नाहीतर ते विष माझ्या मेंदूवर अतिक्रमण करणार, हे नक्कीच होते .
मी धावत धावत वैद्याकडे गेलो.
वैद्यानी मात्र डाव साधला
जुने  वैर आठवून त्याने मंत्र उलटा मारला.
त्यांनी झाले असे,
त्या जातिवादी विंचवाचे विष वरवर चढतच गेले.
आता विष माझ्या नसानसात तांडव करीत होते.
मेंदूवर तर त्यांनी कधीच ताबा मिळवला होता.
मीही त्या जातिवादी विंचवाची एक प्रजात बनलो.
आता मीही चावतोय घराघरात घुसून प्रत्येक माणसांना.

संजय बनसोडे 9819444028

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

वासनेची क्ष किरणे

तुझ्या निरागस शरीराच्या आरपार
मी घुसवली,
माझ्या वासनेची  "क्ष" किरणे.

स्वप्नाच्या घोड्यावर बसून,
हैदोस घालतोय
तुझ्या रोमारोमात.

तु मात्र फिरतेस माझ्यासोबत
मनसोक्त,बेफिक्र
खांद्याला खांदा लावून.

पण, माझ्यातला शैतान जागा होवून
कधी माझ्या मनाच्या नियंत्रणावर कुरघोडी करेल
हे मलाच माहीत नाही.

मी जरी तुझ्यासाठी जिवा भावाचा मित्र असलो..?
शेवटी आहे माणूसच....
वासनेच्या गटारात माखलेला.

तु मात्र एकेक पाऊल सावधपणे टाक.
कारण,
हे वासनाधीन कुत्री टपुनच बसली,
तुझे लचके तोडायला.

*संजय बनसोडे*

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

अन्नाची नासाडी थांबवा


काल महापरिनिर्वाण दिनांनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, खेड्यापाड्यातून आंबेडकरी गोरगरीब जनता महामानवाला अभिवादन करण्यासाठी आली होती.त्यांच्या सोयीसाठी अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी,पक्षांनी,कार्यकर्त्यानी मुम्बईतल्या छोट्यामोठ्या संस्थांनी  अन्नदान वाटप केले. त्या सर्व कंपन्याचे, संस्थेचे,पक्षांचे सर्वप्रथम अभिनंदन.
अन्नदान वाटप होत असतांना मला  एका गोष्टीचे फार वाईट वाटत होते.आपल्या जनतेकडून मला  प्रचंड प्रमाणात अन्नांची नासाडी होतांना दिसली.
एका संस्थेचा टेंपो आला.त्यांनी पोहे आणले.सर्वांनी रांगा लावून पोहे घेतले आणि खाऊ लागले,तोच दुसऱ्या संस्थेचा टेंपो आला त्यांनी वाटप करण्यासाठी खिचडी आणली. पोहे खात असणारी जनता अर्धे पोहे तसेच  सोडून पुन्हा खिचडीच्या रांगेला लागली. ते पोहे मात्र तसेच त्या प्लेट मधे पडलेले.त्यावर कुणी पाय देऊन जात होते कुणी ओलांडून जात होते.तिसरा टेंपो पूरी भाजीचा आला.
काही बहाद्दर असे होते,त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, हे फक्त येथे खाण्यासाठीच आले काय ?
शिवाजी पार्क मैदानात हे असेच चित्र अनुभवायला  मिळाले.
जेंव्हा चार वाजता पुन्हा मी तिथे गेलो, तर जिथे अन्नदान वाटप होत होते ती जमीन अन्नाने माखून गेली होती.
मित्रांनो, तुमच्यासाठी स्थानिक संस्था अन्नदान वाटप करतात.कारण, आपण खूप लांबून बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मुम्बईत येत असता. त्यांची मेहनत पैसा खर्च करून  ते तुमच्यासाठी अन्न आणतात .त्या अन्नांची नासाडी तुम्हांला योग्य वाटते का ?
आपण आपल्या घरात एक भाताचे शीत तरी वाया जावू देतो का ?
मंग येथे का अन्नांची नासाडी ?
पुढच्या वेळी स्थानिक संघटनेने याकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबवला पाहिजे.
संजय बनसोडे

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

बाबासाहेबांच्या वाटेनं

"बाबासाहेबांच्या वाटेनं"
दैववादी बापाने पोराला शिव्या देत म्हणावं,
"आयघाल्या.. धुळ खात पडलेल्या फोटोला
कधी साफ करत नाहीस
कधी हार घालत नाहीस....
काय तोंडवर करून
बाबासाहेब सांगतो रे?"...
दैववादी मायनं पोराला समजावत म्हणावं,
"बाळा तु तुझं कर,मी माझं करते...
तु बुद्धाला मान मी देवाला पुजते...
तुला नाही जमत तर थट्टा तरी नको करूस,
असत्यात रे देव त्यांचा तिरस्कार नको करूस.
दैववादी,"सु"शिक्षीत बहीण भावाने भावाला टोमणं देत म्हणावं,
कसला रे समाज तुझा?
अन कसली तुझी चळवळ?..
नेत्यांसोबत नुसती तुमची,
आप्पलपोटी वळवळ..!
ते पोरगं बिचारं घेतं ऐकुन,
चाळतं बँग..
काढतं पुस्तक बसतं वाचत....
अन मग कळतं त्याला,
बापाला बाबासाहेब मुर्ती अन फोटोपुरताच माहीतीये....
अन मग कळतं त्याला,
मायला बाबासाहेब
नवऱ्याला कळतो तेवढाच माहीतीये...
अन मग कळतं त्याला,
भाऊबहीणीला बाबासाहेब
मायबापाला कळतो तेवढाच माहीतीये...
हसतो मोठमोठ्याने अन म्हणतो.....
"च्यायची येड्यांची जत्रा ही..
चालुद्या तुमचं रहाटगाडगं"..
मी चालणार बुद्धाच्या विचारांवर
हे जीवंत असुन मेलेत,
देव कोपायच्या भीतीनं..!
माझ्या पुढच्या पीढीला नेईन मी,
बाबासाहेबांच्याच वाटेनं...!
सचिन डांगळे...!

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

प्रत्येक देशातील बुद्ध आणि बुद्धांना अनुसरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत...मग चीन असो, जपान असो किंवा थाईलैंड .....प्रत्येक देशात बुद्धांच्या मुर्त्यांपासून ते त्यांच्या आचरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आढळते....
बुद्धांचा जन्म भारतातला....परंतू मनुवाद्यांच्या कट- कारस्थानामुळे त्यांचे विचार व त्यांनी निर्मिलेला बौद्ध धम्म भारतातून नष्ट झाला होता...बाबासाहेबांनी १९५६ साली धर्मांतर करून भारत बौद्धमय करण्याचे पहीले पाऊल  उचलले. पण त्या आधी त्यांनी प्रत्येक धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांना बौद्ध धम्म हा मानवतावादी आणि स्वतंत्र, समता, बंधूता पसरविणारा विज्ञानावर आधारित असलेला असा धम्म वाटला . म्हणून त्यांनी या धम्माचा स्वीकार केला....पण त्रिपिटक आणि धम्मपद असे बौद्ध धर्मग्रंथ असताना बाबासाहेबांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक का लिहावेसे वाटले????? तसेच पंचशील आणि अष्टांग मार्ग असताना बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळी२२ प्रतिज्ञा देण्याची गरज का भासली????
तर त्याला कारणही तसेच आहे...भारताची एकंदर परिस्थिति, त्यातील रुढी परंपरा, जातीव्यस्था व लोकांची इतर जातीतील लोकांशी वागण्याची पद्धति या सर्वांचा विचार करून तसेच भविष्यात हा धर्म अधिक लवचिक व अधिक विज्ञानवादी कसा बनेल या सर्व गोष्टींचा विचार करूनच बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांची निर्मिती केली....
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा या प्रत्येक व्यक्तीस माणूस म्हणून जगण्यास पुरक अश्या ठरतात...या २२ प्रतिज्ञा अंगीकारल्या असता ती व्यक्ती भविष्यात कोणत्याच परिस्थितीत डगमगणार नाही हे मात्र खरे.
तेव्हा ज्या बाबासाहेबांनी आम्हा नवा जन्म दिला त्या बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध आणि बौद्ध धम्म साकारणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते. बाकी भिमसैनिक तर सुज्ञान आहेतच.

जय भिमच

सुचिता कांबळे
( २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक )

भीमानं लिहून संविधान

गुलामगिरीच्या तोडून बेडया घडविला देश महान..
भिमान लिहून संविधान...!
भिमान लिहून संविधान..!

अस्पृश्य होते कोटी कोटी...
मिळे ना पाणी ना ती रोटी...
माणूस म्हणुनी जगतोय आज...
त्याने...दिले ते हक्क समान....
भिमान लिहून संविधान...
भिमान लिहून संविधान...!

देशासाठी झटझट झटला...
देशाने पण जातीत पूजला....
मिरवी देश हा होण्या महा..सत्ताक...
आहे का कोणा जान...
भिमान लिहून संविधान...
भिमान लिहून संविधान..!

प्रसाद गातो..
प्रसाद लिहितो..
आज हां थाटामध्ये ही जगतो...
सांगा...कोणामुळे.... सर्व मिळे मान...

भिमान लिहून संविधान....
भिमान लिहून संविधान...!
      -प्रसाद देठे. (9768674830)
जय भीम । जय भारत ।

#Constitution_Day

#Thanks_Babasaheb_Ambedkar

संविधान

संविधान दिनाच्या मंगलमय सदिच्छा

बा भीमाने...

आम्ही भारताचे लोकं
आहे अभिमान...
बा भीमाने दिले,
आम्हा संविधान.

सार्वभौम, समाजवादी,
धर्मनिरपेक्षता...
राजनैतिक, सामाजिक,
आर्थिक, न्याय व्यवस्था
या मूल्यांची करुन दिली
आम्हा सगळ्यांना जाण
बा भीमाने...

आहे समता, बंधूता,
स्वातंत्र्य या भारता,
टिकवली ज्यांनी ही,
राष्ट्राची एकात्मता
हक्कासाठी लढले आहे
आमचे प्रेरणास्थान
बा भीमाने...

अरे झोपू नका सगळे
वाचा संविधान,
आचरणात घ्या रे...
जागवा स्वाभिमान,
पुन्हा नाही येणार आता
भीमासारखा महान...
बा भीमाने....

-प्रमोद पवार

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

मला हवी असलेली माणसं

पेटवीण्या निघालो समतेचा दिवा
तो दिवा आहे पण त्याची वात नाही !

करावे वाटले सारी रात्र प्रकाशमय
येथे अंधार आहे पण रात्र नाही !

हाय हॅलो करणारे पुष्कळ भेटले
खऱ्या जिवलग मित्रासारखी साथ नाही !

माळावरच्या म्हाताऱ्याची शोधतो निवांत झोपड़ी
कारण, गर्दीतल्या बंगल्यात ती बात नाही !

जाळाव्या  वाटतात त्या फाइवस्टार हॉटेल्स
ज्यात मडक्यात शिजलेला  वरण भात नाही !

जाम खाल्ल्या गॅसवरच्या पाणचट   चपात्या
तिला मायेचा हात अन् चुलीतली राख नाही !

हिरव्यागार झाडाखाली शोधतो गारगार वारा
ज्याला कृत्रिम एसीची साथ नाही !

ते लहानपणच जगावं वाटतं पुन्हा आज
जिथे प्रेमच प्रेम पण प्रेमाच्या नावावर घात नाही !

पूर्वीचेच आपले गाव मस्त होते मित्रा
जिथे फुटकी घरे पण भावकित वाद नाही !

काय जाळावे का या पैशाने माजलेल्या गावाला
जिथे द्वेषच द्वेष पण चुलत्या काकांची प्रेमाची दाद नाही !

*संजय बनसोडे -9819444028*

तुझ्या पाऊलखुणा पुसल्या त्या वैऱ्यांनी

लुटले तुझ्या समाजा, अहिऱ्या गहिऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा, पुसल्या त्या वैऱ्यानी !!

झोंबला असा त्या विंचवाचा डंक
धावती सैरावैरा तुझे ते रंक !
तुटली फांदी झाले घायाळ पाखरू
दिशाहीन झाले ते भीम लेकरू !

जोर धरला त्या विषमतेच्या वाऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा पुसल्या त्या वैऱ्यानी !!

त्या अहिऱ्या गहिऱ्याच्या हे नांदी लागलं
भाव भावकीला सख्या, वैऱ्यागत वागलं !
ना दिसे एकीचे बळ ना दिसे चळवळ
शेंबडे झाले पुढारी करती नुसती वळवळ !

सांगे संजय ठेचा वैरी,मिळून साऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा,पुसल्या त्या वैऱ्यानी !!

संजय बनसोडे 9819444028

तुझ्यात नाही भीमाचे गुणं

होऊन मवाली जोहार घाली
वाजवी वैऱ्याचं तुणतुणं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

खातो कुणाचं गातो कुणाचं
तुलाच हाय का ठावं
मागे तु सरला कसा विसरला
मनुवादी तो घावं !

कसे फेडसी या जन्मी तु
बाबासाहेबांचे ते ऋणं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

नको हुजरेगीरी ती मुजरेगीरी
नको गुलामीत त्या बद्ध
अनुसरून भीमाला शरण बुद्धाला
जाऊन हो तु शुद्ध !

लिहतो संजय तुझ्याच साठी
पाहून गुलामीचं हे जीनं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

संजय बनसोडे 981944028

शातिर औलाद

*शातिर औलाद*

इंग्रजी विचाराने गर्भधारण झालेली
व सनातनी विचारप्रवाहात
बाळंत झालेली
ही शातिर औलाद.
जन्मतःच रक्त पिपासू बनून
चिटकली आमच्या अंगा खांद्याला.
आम्हीही तिला धिक्कारलं नाही
वाढू दिलं आमच्या अंगा खांद्यावर.
त्यांच्या नाजायज बापाने
आणल्या
परदेशातून लाखो कंपन्या
तिथेही त्यांनी आम्हांला शूद्रच घोषित केले,
आणि नाव ठेवले
सफाई कामगार, शिपाई, वाचमॅन, वर्कर
आणि ते बनले
MD, VP,GM
त्यांची पान्हावलेली माय
आजही हंबरडा फोडते
पण ते आमचे रक्त पिण्यातच मग्न आहेत.

संजय बनसोडे

झाली झांजर ....

फुटला आकाशी तांबडा पाझरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

खोप्यात पाखरू, घेई खुशीत लेकरू
गोठ्यात वासरु, दूध पिये चुरूचूरू !

गाय चाटती खुशीमंधी वासरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

ठोकली आरोळी, बाग दिली कोंबड्यानं
धुडगूस घातला त्या, कळपात मेंढरानं !

डोळं चोळीत उठलं पोरं साजरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

लाडी गोडी करी सखा,मैना चोरीते अंग
दाने टिपण्या पिल्ले, फिरती कोंबडी संग !

भरती नळावर कुणी त्या घागरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

संजय बनसोडे 9819444028

वादळवारा.....

सूर्यही नव्हता चंद्रही नव्हता
नव्हता तो रं तारा
वादळवारा ..........
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

बघून धरणी थरथर कापे
लाव्हाचा हुंकारं
ऐकून वाणी आकाश फाटे
अशी ती भीम ललकारं
पाण्यालाही आग लावली
होता ज्वलंत तो निखारा
वादळवारा ...................!!

वीज होऊनी क्षणात करी
दुश्मनावरी वार
दिन दलितांसाठी तो लढला
करुन पेनाला तलवार
दिन दुबळ्यांचा झाला दाता
दिला तयांना थारा
वादळवारा ....................!!

मनुवादाला मातीत गाड़णारा
होता मर्दानी तो नर
नतमस्तक होऊन भीमचरणी
झुकती संजयाचे कर
अभिमानाने सन्मानाने
देती जय भीम सारे नारा
वादळवारा .................
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

संजय बनसोडे

तुझ्या नरकातल्या यातना मी जिवंतपणीच भोगल्या

भर चौकात नागडं करतय
नशीब नावाचा  वैरी

मेलेल्या ढोराप्रमाणे,
रोजच काढतय  सालपट
भूक नावाची सूरी

तोडतात लचके देहाचे चिकन तंदूरीगत
वासनाधीन कुत्री

स्वप्न तळल्या जातात भज्याप्रमाणे
वासनेच्या कढ़ाईत

तु काय भीती दाखवतो  रे सुकाळीच्या,
मला त्या नरकाची

तुझ्या त्या नरकातल्या यातना
मी जिवंतपणीच भोगल्यात

संजय बनसोडे

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

गरीब आणि श्रीमंत



एका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे  सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो.
दिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात.दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पडते.
दिवसभर भर उन्हात लोखंडाच्या  टिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी !
                         दिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीवर  बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे ते श्रीमंतांचे पोट, जेंव्हा तो रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा त्याच्या मनाला एक प्रश्न पडतो, आज आपण काय खायायचे अन् का खायायचे ? 
कारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करते.दहा दहा बल्ब असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय ?खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्याच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला डावलन्यासाठी तो सतत पळत असतो ,खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला !
             त्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे घालून  आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाच्या आगीला थंड करणारे  अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात . शांतपणे , ना पंखा ना  AC . गाढ झोपी गेलेले ते दोन जीव.आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो !
         इकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नाही.
रात्रीचे  बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघेही उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजाडलाच नाही. त्या
दोघापैकी एक मधेच बोलला " डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे ? . . . . . . . . . "

संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल

*पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल*

महाराष्ट्रात कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या समाजाचे मोर्चे निघाले नसतील, ते आज सर्वच समाज आपआपल्या समाजाची ताकत दाखवण्यासाठी मोर्चे काढत आहे.
कोपर्डीच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मराठा मूक मोर्च्याचा  मूळ मुद्दा राहिला बाजूलाच,आणि बौद्ध व दलितांच्या संवरक्षणासाठी असलेला  *ॲट्रॉसिटी कायदा बंद करा* हिच मागणी मुख्य होऊन बसली त्यामुळे कळत न कळत बौद्ध व दलित समाजाचे या मोर्च्यांमुळे मने दुखावल्या गेली. त्यांच्यात अशांततेची भावना निर्माण झाली. एकमेका विरोधात द्वेष निर्माण होत गेला. आणि त्याचा पडसाद आपण नाशिक येथे पाहिलाही.
या अशांततेच्या भावनेतून दलित आणि बौद्ध समाजाने  ॲट्रॉसिटीच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात प्रतीमोर्चे काढायला सुरवात केली आणि त्यांना उद्देशून  *तुम भी देखो आँखों से, हम भी आये लाखो से*  असे सांगीत आम्हीही काही कमी नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकताच मनुवादाची  कीड़ झुंगारुन आंबेडकरी विचारांना आत्मसात करणारा मराठा बांधव पुन्हा आंबेडकरी विचारधारे पासून व बौद्ध बांधवा पासून  दूर लोटल्या गेला. आंबेडकर साऱ्या जाती धर्माचा म्हणणारा पुरोगामी मराठा वर्गही आज आंबेडकर फक्त बौद्ध आणि दलितांचेच आहेत त्यांनी आमच्यासाठी काय केले ?असे  म्हणू लागला. ज्या मराठा संघटनानी मोठ्या मेहनतीने मराठा समाजात फुले शाहू आंबेडकरी विचार रुजवले आज ते लयाला जातात की काय याची भीती निर्माण झाली.
औरंगाबाद विद्यापीठ नामांतरा  वेळेस बौद्ध,  मराठा वाद पेटला होता तसाच पुन्हा पेटणार की काय अशी भीती निर्माण झाली.
दलित, बौद्ध समाजावर होत असलेले अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही तोच मराठा समाज,  बौद्ध व दलितांचा  अत्याचार प्रतिबंधक कायदाच  रद्द करा अशी मागणी प्रचंड जनसमुदाय असणाऱ्या मूक मोर्चात होत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात बौद्ध,दलित वस्त्यात  भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. पण धम्मचक्र परिवर्तन दिनी मुख्यमंत्री साहेबांनी दीक्षाभूमीवरून जेंव्हा सांगितले की, दलित बांधवांना घाबरण्याचे कारण नाही. हा कायदा रद्द होणार नाही. तेंव्हा कुठे दलित व बौद्ध  समाजाच्या जीवात जीव आला. कारण, जातिवादी गावगुंड प्रत्येक गावात आहेत. हा कायदा असतांना जर एवढा  अत्याचार तर कायदा बंद झाल्यावर किती होईल ?

मूक मोर्च्याची दूसरी मागणी होती आरक्षण. आपण गावागावात  जावून सर्वे केला तर तुम्हांला समजेल की, काही बोटावर मोजण्या इतकी घरे सोडली तर मराठा समाजातल्या सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे . म्हणून मराठा संघटनेचा  आरक्षण हा मुद्दा रास्त आहे हे  सर्वांनीच मान्य केले.पण कायद्याने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे कसे ? ही मोठी समस्या महाराष्ट्र सरकार पुढे आहे. सद्ध्याची आरक्षणाची स्थिती  बघता मराठा  समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळे एकच पर्याय आहे, त्यांचा OBC मधे समावेश करणे. त्यानंतरच त्यांना न्यायिक मार्गाने आरक्षण मिळेल. पण OBC मधे समाविष्ट असलेल्या समाजाला भीती निर्माण झाली की महाराष्ट्रात प्रचंड मोठा असलेल्या मराठा समाजाचा जर OBC मधे समावेश झाला तर सद्ध्या आमच्या जातीला मिळत असलेले आरक्षण संकुचित होईल आणि या आरक्षणाचा फायदा फक्त मराठा समाजालाच मिळेल. त्यामुळे OBC बांधव प्रतीमोर्चे काढून सरकारला निवेदन देत आहे की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण *आमच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना ते दिले पाहिजे.* OBC समाजाचे मोर्चे बघून पुन्हा मराठा विरुद्ध OBC हा नवा वाद पेटणार की काय ?अशी भीती वाटू लागली आहे. आपआपल्या हक्कासाठी विविध समाज रस्त्यावर उतरला असतांना मुस्लिम बांधव मागे कसे राहणार. मुसलमानही आता आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढून रस्त्यावर उतरला  आहे.

सद्ध्या महाराष्ट्रात निघत असणाऱ्या मोर्च्यांने काही निष्पन्न होणार की नाही हे  माहीत नाही पण एकमेका विरोधात द्वेष मात्र नक्की निर्माण होईल. त्यामुळे मला असे वाटत आहे की, पुरोगामी झालेला महाराष्ट्र पुन्हा प्रतिगामी वाटचाल करते की काय ?

मनोगत ..............🖋
( हा लेख कुण्या मोर्चेकरांच्या भावना दुखवण्यासाठी लिहला नसून हे माझे व्यक्तीगत मत आहे )

संजय बनसोडे

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शांत आहे निळे आकाश नका त्याला छेडू

शांत आहे निळे आकाश
नका त्याला छेडू
जर कडाडले तुमच्यावर
नका दोष देत रडू

शांत झालं निळं वादळ
नका त्याला छेळू
जर उठले सोसाट्याने
धूम ठोकीत नका पळू

शांत आहे निळा सागर
नका हसू बघून छोटी लाट
जर खवळला तुमच्यावर
क्षणात करील तुमचा नायनाट

शांत आहे निळी शाई
नका करू तिचा हेवा
जर पेटून उठली तुमच्यावर
ना भेटणार त्यावर दवा

संजय बनसोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी ?

महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात हिंदू धर्मात ब्राह्मणी व्यवस्थेतील मनूच्या कायद्याने स्त्रियांना बहुजन समाजाला गुलाम केले आहे.म्हणून ती मनुस्मृती जाळली पाहिजे. अशा कठोर शब्दात महात्मा ज्योतीबा फुले मनुस्मृतीचा निषेध करतात.
म्हणुनच, आपल्या गुरूचे अधूरे राहिलेले कार्य त्यांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गुरुचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून महात्मा ज्योतीबा फुलेचे अधूरे स्वप्न पूर्ण करतात.
पण मित्रांनो मला दुःख या गोष्टीचे वाटते, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साठ वर्ष उलटून ही  अजून कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी मला दिसला नाही.
आजपर्यंत आंबेडकरवादी म्हणून मिरवणारे ऐतखाऊच पैदा झालेत, पण माझ्या बापाचा खरा अनुयायी अजून पैदाच झाला नाही.वामनदादा आपल्या गीतात "पाच लोके असते तर ....."म्हणाले होते. पाच तर दुरच, एक जरी पैदा झाला असता तर हा सारा भारत बौद्धमय झाला असता.
पण आंबेडकरवादी नावाचा बूरखा घालून मिरवणारे हे बेईमानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पोट कसे भरेल यातच दंग आहेत.
गावकूसाबाहेरचा वीस पंचवीस घराचा बौद्धवाडा त्यांच्यातही तीन तीन पार्ट्या, हा त्यांच्या जयंतीत जात नाही तो यांच्या जयंतीत येत नाही. त्यांच्यातही अध्यक्ष पदावरून भांडणे. साले असतात अंगूठा छाप, पद मात्र अध्यक्षाचेच हवे. काय खाक भीमकार्य होईल या गाढवाकडून !
शहरातही तिच दशा, जो उच्चवर्णीय व्यापार धंद्यावाला आंबेडकरी समाजाला आंबेडकराला अजूनही तुच्छ लेखतात त्यांनाच जयंतीची पावती देऊन भीक मागतात आणि  ऑर्केस्ट्राच्या नावाने बाया नाचवतात, उरलेले पैसे खिशात घालून एक वर्ष विहाराकडे आणि बाबासाहेबांच्या कार्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.
पण आजच्या नवतरुणांनी अशा मूर्खापासून दुरच राहिले पाहिजे, तरच समाजपरिवर्तन होईल अन्यथा जसा भटांनी धंद्यासाठी  देव उभा केला तसेच बाबासाहेबांच्या नावाने त्यांच्या  गरीब जनतेला लुबाडून हे बाबासाहेबांच्या नावावर धंदा केल्याशिवाय राहणार नाहीत.

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...