ॲट्रॉसिटीत बदल नाही तर तो कायदाच बंद करा.जाती बघून जर कायदे होत असतील, आरक्षण मिळत असतील तर देशाचे तुकडे व्हायला फारसा वेळ लागणार नाही. असे मराठा संघटनेच्या मूकमोर्चात सहभागी होणाऱ्या काही मराठा नेत्यांचे म्हणणे आहे.
या मराठा नेत्यांचे म्हणणे आम्हांलाही पटते पण, तागड्याच्या एका पारड्यात दहा ग्राम वजन आणि एका पारड्यात शंभर ग्राम वजन असले तर तागड्याचा काटा समान असूच शकत नाही. तो शंभर ग्राम वजन असलेल्या पारड्याकडेच झुकलेला असेल. जर त्या तागड्याचा काटा आपल्याला समान करायचा असेल तर ज्या ठिकाणी दहा ग्राम वजन आहे त्या ठिकाणी आपल्याला आणखी नव्वद ग्राम टाकावे लागेल तरच दोन्ही पारडे समान होतील.
तसेच,आरक्षण आणि ॲट्रॉसिटी सारखे कायदे मागास जातीला समान अधिकार मिळण्यासाठी, व अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी दिले आहेत.
हजारो वर्षापासून जो समाज तुमच्या शेतावर मोलमजुरी करून दिवस कंठीत होता, जो समाज गावातली घाण काढून जोहार मागून तुमच्या शीळ्या तुकड्यावर जगत होता.जो समाज प्राण्यांची शिकार करून जगत होता, जो समाज अभिनय करून गावागावात जावून करमणूक करीत होता.जो समाज दगड फोडून आपल्या कुटुंबाचा गुजारा करीत होता,जो समाज तुमच्या शेतीत लागणारे अवजारे बनवित होता,जो समाज तुम्हांला पाणी पिण्यासाठी मडकी बनवत होता, जो समाज तुमची आणि तुमच्या जनावरांची हजामत करीत होता, या सर्व अनुसूचित जाती जमातीला तुमच्या सारखी जमीन व दूसरे कामे नव्हती ते वर्षानुवर्ष हेच करीत आले आहेत.हे सर्व समाज पूर्वी तुमच्यावरच अवलंबून होते आज ह्या समाजाची फार दैनंदिन अवस्था आहे.त्यांच्या हातात आज कामधंधा नाही,नौकरी नाही,शेती नाही. असा समाज जास्त तर शहरात जावून भेटल ते काम करतांना दिसतो, काहीजण आजही गावात राहून तुमच्या शेतात राबताना दिसतात.यातल्या काही जणांची परिस्थिती सुधारलीही असेल काहींना आरक्षणातून नौकरी ही लागली असेल पण सुधारलेल्या कुटुंबाचे प्रमाण किती टक्के आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
पारधी समाज आजही रानात राहुन दिवस काढतो त्यांना संवरक्षणाची गरज आहे की नाही ?
वडार समाज आजही भेटेल त्या ठिकाणी कुटुंबासोबत हातोडी घेऊन जातो त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे की नाही ?
आज जर तुम्ही प्रत्येक गावात जावून संशोधन केले तर तुम्हांला असे आढळेल की सर्वात जास्त कामधंद्यासाठी स्थलांतरीत झालेला कुठला समाज आहे तर तो बौद्ध आणि मातंग समाज. आजही गावागावातल्या गावकूसावरचा बौद्धवाड्यातले आणि मातंगवाड्यातले तरुण मुले तुम्हांला शहरातच काम धंद्यासाठी भटकताना दिसतील.
का झाले हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत ?
कारण त्यांच्या बापजाद्याकडेच जमिनी नव्हत्या तर त्यांच्याकडे कुठून येणार ?
थोडा काही खडकाळ जमिनीचा एक दीड एकर टुकड़ा आहे त्यात काहीच होत नाही.त्यामुळे जमेल त्या शहरात ते स्थलांतरीत झाले व भेटेल तो कामधंदा करून आपले पोट भरीत आहेत.काय त्यांना जातीय आरक्षणाची गरज नाही ?
मी असेही म्हणत नाही की, गावातला आणि शहरातला प्रस्थापित मराठा समाजच श्रीमंत आहे.पण मराठा समाजातल्या श्रीमंताची यादी मोठी आहे व मागास समाजातल्या लोकांची सख्या चार पाच टक्क्याच्या वर भरणार नाही. आणि हा फरक समान करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.
ॲट्रॉसिटी बंद करायची की नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेईल पण मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करीत आहे तीही रास्त आहे. त्यांच्या समाजातही गरीब बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे.त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे पण मागासवर्गीयांचे पारडे आहे त्याच्या खाली जाता कामा नये.
भीमकवी संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा