गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

आकांत

आकांत
संजय बनसोडे
मूल जन्मल्यानंतर सर्वजण विचारात, "मुलगा झाला की मुलगी ?" फक्त त्या बाळाची आईच विचारते "माझे बाळ कसे आहे ?"
तीन घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरच्या  हातात एक गोंडस बाळ येतं. नऊ महीने त्या बाळामुळे आपल्या पोटात  भ्रूण अवस्थेपासून ते प्रसूत होईपर्यंत  असह्य कळा सोशीत वेदनेच्या कह्यातून मुक्त झालेली विमल,बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच डॉक्टरला विचारते "मुलगा झाला की मुलगी ?"होय....एक आईच विचारते डॉक्टरला, मला मुलगा झाला की मुलगी ? तेंव्हा डॉक्टरचे उत्तर येते "मुलगी "
मुलगी हा शब्द ऐकताच विमलचा चेहरा सुन्न पडतो तिचे  अंतर्मन धाय मोकलून रडत असते .प्रसूतीच्या वेळेस तिला जेवढ्या यातना झाल्या नाही त्याहून जास्त यातना तिला "मुलगी "हा शब्द ऐकून होतात.
त्याला कारण ही तसेच होते. एक   मुलगी जेंव्हा एका गरिबाच्या घरात जन्मा येते तेंव्हा तिचे काय हाल होतात या जगात तिला किती बेअदबीने जगावं लागते ते विमलला चांगलेच ठाऊक होते.डॉक्टरने नाळ तोडून बाळ साफ करण्यासाठी बाहेर नेले.विमल मात्र तिथेच पडून आपल्या भूतकाळात आणि येणाऱ्या मुलीच्या भविष्यकाळात गर्क झाली होती.
जातं कितीही उपटलेले असले तरीही  त्यातून भरडाच  बाहेर पडतो पीठ नाही . तसेच एका श्रमिकाने  कितीही कष्ट केले तरी त्याच्या जमापूंजीत खुर्दाच असतो त्याचे नोटात रुपांतर कधीच होत नाही. आज कितीही स्त्री पुढे गेली तरी गावखेड्यातली स्त्री आजही या पुरुषप्रधान देशात स्वातंत्र्यासाठी हंबरडा फोडत आहे.आजही ती  या आपदातून मुक्त करणाऱ्या मुक्तिदात्याची वाट बघत बसली आहे.
विमलचा जन्मही असाच एका मुलाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या आई वडिलांच्या घरी होतो. मुलाच्या प्रतिक्षेत असलेल्या आई वडीलाची ही तीसरी  कन्याच असते. बापाचे हातावरचे पोट.  शेतात, गावात मिळेल ते काम करायचे अन् पोट भरायचे.वंशाच्या दिव्याची वाट बघत बघत तीन मुलीचा बोज अंगावर पडला त्यांचे लग्न कसे करायचे ? त्यांना हूंडा कुठून द्यायचा ? या चिंतेत असलेला विमलचा बाप, हळूहळू दारूच्या आहारी गेला. दिवसभर मेहनत करून  कमावायचे अन् रात्रभर दारू पिऊन दारूच्या गूत्यावरच पडून रहायचे.घरी गेला तर तीन  मुलींच्या लग्नाची चिंता. त्यामुळे त्यांनी घरच सोडून दिले.
मुलांना सांभाळण्याची सारी जिम्मेदारी तिच्या एकट्या आईवर पडली. दर साल दुष्काळाने पिंजून निघणारे गाव अन्  त्या गावात रोज मजुरी करून एकाच्या जीवावर चार  जीव पोसने तिच्या आईला असह्य झाले.
बोलतात ना, दुःख हे उखलाशी असते.पण विमलच्या कुटुंबाचा दुखाचा डोंगर सरता सरेना. पोटाला चिमटा देत अन् दुखाला आलिंगन देतच विमल व तिच्या बहिणी लहानाच्या मोठ्या झाल्या. आता कमावणारे आठ हात झाल्याने हळूहळू दुःखाचे रुपांतर सुखात परिवर्तित होत होते.उपाशी पोटी झोपण्याचे दिवस आता संपले होते.पण नियतिला ते मंजूर नव्हते. ऐन ज्वानीच्या उंबरठ्यात पदार्पण केलेल्या त्या तीन जीवाचे लचके तोडण्यासाठी  गावातले गिधाडे टपूनच बसली होती.शेवटी त्या गिधाडाने डाव साधलाच, तालुक्याचा बाजार असल्यामुळे विमलची आई आणि विमल तालुक्याला गेल्या. त्यामुळे  गावकूसाबाहेरच्या एकांत झोपडीत दोन तरण्या तांड्या मुली आज एकट्याच आहेत याचा फायदा उचलत काही गावातल्या शैतानी वृत्तीच्या चांडाळानी अत्यंत क्रूरपणे त्या दोघीजणींवर बलात्कार केला. आणि तेथून पसार झाले. विमल आणि तिची आई घरी आल्यावर इभ्रतीला काळिमा फासणारी ही  घटना कळली.घटना कळताच  विमलच्या आईने सरपंच,पाटील आणि गावकऱ्या समोर न्यायासाठी पदर पसरला. पण बलात्कार करणारे प्रस्थापितांचेच मुले असल्यामुळे विमलच्या बहिणीनाच गलत साबित करून,आमच्या मुलांना नादाला लावून गावात ह्या वेश्याव्यवसाय चालवतात असे ठासून सांगत  त्यांनाच गालबोट लावून बदनाम केले. तेंव्हापासून साऱ्या गावाने त्या घराला वायाळ टाकले त्यांची रोजमजुरी बंद केली गावातून त्यांचे राशनपाणी बंद केले. बलात्कारा ची घटना घडली तेंव्हापासून विमलच्या आईने खाट पकडली. या घटनेमुळे विमलच्या आईला मोठा धक्का बसला तिने  खाणे पिणे बंद केले तिला जगण्यापेक्षा मरणाला कवटाळनेच बरे वाटत होते. घरात बीमार असलेले आई गावांने टाकलेला बहिष्कार,यातून कसा मार्ग काढावा हे विमल व तिच्या बहिणीला कळत नव्हते.गाव सोडून बीमार आई सोबत स्थलांतर तरी कसे करावे ?
थोडेफार घरात राशन होते तेच थोडे थोडे करून गावातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नऊ दहा दिवसातच अन्न पाण्यावासून बीमार असलेली विमलची आई गतप्राण झाली.आईची अंत्यविधी झाल्यावर त्या तिघी बहिणीने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही आता चांगलेच माहिती होते की, गावातील राक्षस वृत्तीचे माणसे आपल्याला सोडणार नाहीत. पण जायचे कुठे ? बाहेर आपले कुणीच नाही. रोज रोज गावात मरण्यापेक्षा एखाद्या मोठ्या शहरात स्थलांतरीत होऊन पुन्हा नव्या उमीदीने जगू. त्या दोघीनी निर्णय घेतला, आपले तर मात्रे झाले पण विमलचे असे होऊ द्यायचे नाही.शहरात जाऊन मिळेल ते काम करू आणि विमलचे मोठ्या थाटामाटात लग्न करू. शेवटी नव्या जीवनाच्या शोधात त्यांनी मुम्बई गाठली.मुम्बई कुणाला उपाशी मारत नाही त्यामुळे त्याही आल्या जीवाची मुम्बई करायला.
एका झोपड़पट्टी जवळील फुटपाथवर छोटेसे झोपडे बांधून तिथे विमलला ठेऊन त्या रोज जात असत कामाच्या शोधात पण काम काही केल्या  त्यांना भेटत नव्हते. त्यांनीही हार मानली नाही रोज या ना त्या एरियात जावून त्या कामाचा शोध घेत होत्या. घार उंच आकाशात उडून अफाट पसरलेल्या जमिनीवर लपलेल्या पक्षांवर नजर ठेऊन झेप घेते व शिकार करते.असेच शिकारी, वेश्या व्यवसायांचे दलाल लेडीज डान्स बारचे दलाल यांचीही अफाट पसरलेल्या, माणसांनी गजबजलेल्या गर्दीत अचूक वेध घेऊन आपली शिकार न्याहळीत असतात. अशाच शिकाऱ्याची नजर या दोन बहिणीकडे जाते.तो दोन दिवस त्यांचा पाठलाग करतो  त्यांची  सर्व माहिती काढून त्यांना काम मिळेल पण डान्स बार मधे कस्टमरला खुश ठेऊन डान्स करावा लागेल असे त्यांना त्यांच्या मजबूरीची नस पकडून अगोदरच सांगतो व या कामासाठी किती पैसा मिळेल हेही सांगतो. एक महीना चारजण  काम करूनही जितका पैसा येत नव्हता तितका एका दिवसात कमावयाला मिळतो हे बघून त्यांना नवलच वाटले. इज्जत नावाची पांघरूण  कधीच आपल्या अब्रूवरून फेकल्या गेलं होतं हे दोघीनाही ठाऊक होतं. आता फक्त जगायचं ते विमल साठीच. त्यामुळे त्यांनी या कामाला लगेच होकार दिला. डान्स आणि त्या दोघीचा दूरदूरपर्यंत संबध नव्हता तरीही पोटाच्या आगीसाठी व विमलसाठी "माय नेम इज शीला" "मुन्नी बदनाम हुईं "अशा गाण्यावर नाचून  वेगवेगळ्या मर्दासोबत त्या आपल्या शरीराचा  सौदा करीत होत्या.थोडा पैसा जमा झाल्यावर त्यांनी थोड्या चांगल्या झोपड़पट्टीत भाड्याने घर घेतले. त्या दोघीनी रात्रभर बारमधे खपायचे आणि विमलने फक्त घरच सांभाळायचे. अशातच शेजारी असलेल्या मनोजसोबत तिचे प्रेम विवाह जुळतात. विमलच्या दोघी बहिणीनाही मनोज पसंद पडतो.  वेळ न घालवता हॉल बूक  करून विमलचे  मोठ्या थाटात  त्या लग्न लावून देतात. लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या शेजारीच एक खोली भाड्याने देतात.लग्नाला तीन चार महीने झाल्यानंतर विमलला दिवस जातात आणि अचानक मनोज गायब होतो तो कायमचाच. तिघीही पोलीस स्टेशनला जावून मनोज बेपत्ता आहे म्हणून तक्रार नोंदवतात.पोलीस मनोजचा फोटो मागतात.विमल तिच्या बॅगेत असलेला फोटो देते तो फोटो बघून पोलीस थक्क होतात. कारण, तो एक गुन्हेगार असतो.आतापर्यंत त्याने चार मुलींना असेच फसवलेले असते विमल त्याची पाचवी शिकार असते.
विमलचे मूल घेऊन तिच्या दोन बहिणी तिच्या जवळ येतात अन् विमलला म्हणतात.बघ तुझं बाळ सेम तुझ्यावरच गेलं.
बाळाला बघून ती हसत त्यांना म्हणते, होय माझ्यावरच गेलं पण त्याचं जीवनही माझ्यावर जाऊ नये .....
संजय बनसोडे 9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...