शुक्रवार, २९ जुलै, २०१६

घे निळ्या नभाचा आसरा deu vadalashi lade ya kavitasangrahatun

कुठे मस्ज़िती कुठे मंदिरी
का भटकतो भीम वासरा
घे निळ्या नभाचा आसरा !
दैवी ध्यास आहे आभास
शरण जा त्या निळ्या नभास
उपास तापास तुझे ते चाळे
करितोस का मला न कळे !
भीम अमृत तुझ्या दाराशी
बघ त्या ज्ञान पाझरा
का भटकतो भीम वासरा
घे निळ्या नभाचा आसरा !!
विवेकी शुद्ध कर मस्तक
नको होऊ भोंदूचा हस्तक
नको फासू दगडा शेंदूर
22 प्रतिज्ञेच्या नको जाऊ दूर
अंधश्रद्धेची तुझ्या नाकी वेसण
भोंदू बुवांच्या हाती कासरा
का भटकतो भीम वासरा
घे निळ्या नभाचा आसरा !!
उकळतो तु खाती ते साय
वळू दे कधी विहारी पाय
झालासी का तु गद्दार
ये स्वधर्मी हो खूद्दार !
सांगे संजय ये परतूनी
विलिन हो निळ्या सागरा
का भटकतो भीम वासरा
घे निळ्या नभाचा आसरा !!
संजय बनसोडे 9819444028

बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी ??


महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात हिंदू धर्मात ब्राह्मणी व्यवस्थेतील मनूच्या कायद्याने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले आहे.म्हणून ती मनुस्मृती जाळली पाहिजे. अशा कठोर शब्दात महात्मा ज्योतीबा फुले मनुस्मृतीचा निषेध करतात.
म्हणुनच, आपल्या गुरूचे अधूरे राहिलेले कार्य त्यांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गुरुचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून महात्मा ज्योतीबा फुलेचे अधूरे स्वप्न पूर्ण करतात.
पण मित्रांनो मला दुःख या गोष्टीचे वाटते, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साठ वर्ष उलटून ही  अजून कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी मला दिसला नाही.
आजपर्यंत आंबेडकरवादी म्हणून मिरवणारे ऐतखाऊच पैदा झालेत, पण माझ्या बापाचा खरा अनुयायी अजून पैदाच झाला नाही.वामनदादा आपल्या गीतात "पाच लोके असते तर ....."म्हणाले होते. पाच तर दुरच, एक जरी पैदा झाला असता तर हा सारा भारत बौद्धमय झाला असता.
पण आंबेडकरवादी नावाचा बूरखा घालून मिरवणारे हे बेईमान,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पोट कसे भरेल यातच दंग आहेत.
गावकूसाबाहेरचा वीस पंचवीस घराचा बौद्धवाडा त्यांच्यातही तीन तीन पार्ट्या, हा त्यांच्या जयंतीत जात नाही तो यांच्या जयंतीत येत नाही. त्यांच्यातही अध्यक्ष पदावरून भांडणे. साले असतात अंगूठा छाप, पद मात्र अध्यक्षाचेच हवे. काय खाक भीमकार्य होईल या गाढवाकडून !
शहरातही तिच दशा, जो उच्चवर्णीय व्यापार धंद्यावाला आंबेडकरी समाजाला व आंबेडकराला अजूनही तुच्छ लेखतात त्यांनाच जयंतीची पावती देऊन भीक मागतात आणि  ऑर्केस्ट्राच्या नावाने बाया नाचवतात, उरलेले पैसे खिशात घालून एक वर्ष विहाराकडे आणि बाबासाहेबांच्या कार्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.
पण आजच्या नवतरुणांनी अशा मूर्खापासून दुरच राहिले पाहिजे, तरच समाजपरिवर्तन होईल अन्यथा जसा भटांनी धंद्यासाठी  देव उभा केला तसेच बाबासाहेबांच्या नावाने त्यांच्या  गरीब जनतेला लुबाडून हे बाबासाहेबांच्या नावावर धंदा केल्याशिवाय राहणार नाहीत.
संजय बनसोडे
9819444028
घणसोली गाव
नवी मुम्बई

माझा खापर पणजोबा

आमचा खापर पणजोबा देवाचा लय मोठा भक्त त्यामुळे आमच्या घरात दैविक वारसा लाभला. दरवर्षी देवाच्या वाऱ्या करायच्या देवाला नवस बोलायचे त्यांच्या भेटीला पायी पायी शेकडो अंतर कापत जाऊन त्यांच दर्शन घ्यायच. त्याचे कारणही तसेच होते, तेंव्हा शिक्षण म्हणजे काय हे दूरदूर पर्यंत माहित नव्हते त्या काळात तर विज्ञानाने भारत मातेच्या पोटात प्रवेश ही केला नव्हता. त्यामुळे माझ्या खापर पणजोबाला वाटायचे की, हे जे घडतंय, दिवस, रात्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सारे आमचा देवच आमच्यासाठी घडवतय, तोच आम्हांला प्यायला पाणी खायाला अन्न श्वास घ्यायला हवा देतो, तोच आमची जडण घडण करतो तोच आम्हांला आयुष्यभर सुखी ठेवतो.
जर तो आपल्यासाठी येवढे करीत असेल तर आपणही त्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करावी सर्व मिळून त्याच्या भेटीला जावं, त्याला खुश ठेवावं. खापर पणजोबानी आयुष्यभर वाऱ्या केल्या देव देव केला शेवटी म्हातारे होऊन देवा घरी गेले. त्यांची जागा माझ्या आजोबांनी घेतली, देश स्वतंत्र झाला खेड्यापाड्यात शिक्षणाची सुरवात झाली. नवीन पिढी शिकत होती विज्ञान समजत होती पण घरात दैववादी वारसा असल्यामुळे खरे विज्ञान विसरून हे पण त्या विधात्याच्या आशीर्वादानेच होत आहे समजून पुढे पुढे शिक्षण घेत होती. खापर पणजोबा आणि आजोबा फक्त देवांवर आणि दैवी शक्तींवर अवलंबून होता. नुकसान झाले तर नशिबातच नव्हते फायदा झाला तर देवांनीच केला. पण वडील शिक्षण शिकूनही देव देव करीत होते, नशिबाला दोष देत होते,विज्ञान शिकूनही विज्ञानाला समजत नव्हते. शिक्षण शिकून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करीत होते आणी आम्हां सांगत होते हे सारे देवाच्या आशीर्वादानेच आपल्या नशीबी आले.
तेंव्हा मला कळत नव्हतं की खरा अज्ञानी कोण ?
माझा खापर पणजोबा व आजोबा का सर्व शिक्षण घेऊन अंधश्रद्धा जोपासणारा माझा बाबा ?
मनोगत . . . . . . . . . . ✒
संजय बनसोडे
नवी मुम्बई

सोमवार, २५ जुलै, २०१६

कोपर्डी प्रकरणासंदर्भात मराठा संघटनांना दलित नेत्यांची ऍलर्जी का ?


१)
कोपर्डी प्रकरणा संदर्भात मराठा संघटनांना दलित नेत्यांची ऍलर्जी का ?
रविवारी नेरुळ मधे अल्पवयीन स्वप्नील सोणावणे याची काही जातिवादी वृत्तीच्या लोकांनी हत्या केली त्याच्या विरोधात सर्व धर्मीय निषेध सभा आयोजीत केली होती. ज्या आगरी समाजातील काही जातीवाद्याने  स्वप्नीलला त्याच्या आई वडिला समोर जिवे मारले, त्याच आगरी समाजातील कार्यकर्ते आज पीड़ित कुटुंबाच्या दुखात सहभागी होऊन   दोषी विरोधात ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी करीत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जी जाती अंताची लढाई होती तिचे  सर्वच समाजातील पुरोगामी विचारवंत स्वागत करतात.
आगरी समाज,मराठा समाज बौद्ध समाज साऱ्यांनी स्वप्नीलला  रविवारी श्रध्दांजली वाहली.
कुठेही घडलेल्या दलित अत्याचार प्रकरणी भेट देण्यासाठी येणाऱ्या कुठल्याच जाती धर्मातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना अडविण्यात येत  नाही. कोपर्डी बलात्कार विरोधात सारेच दलित कार्यकर्ते पेटून उठले. सर्वच क्षेत्रातून कोपर्डीत घडलेल्या,माणुसकीला काळिमा फासणाऱ्या  बलात्काराचा  निषेध होत आहे. असे असतांना सुद्धा तिथे काही संघटने तर्फे मराठा समाजात दलितांविरोधात द्वेष पसरवण्याचे कारस्थान होत आहे. म्हणूनच काही मराठा संघटना  पीड़ित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या दलित नेत्यांना अडवित आहेत. ऍट्रॉसिटी सारखे कायदे बंद करण्याची मागणी करीत आहेत.
२)
स्वप्नील च्या आई वडिलांची मागणीही हे सरकार पूर्ण करील का ?
कोपर्डी येथे भेट देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मराठा संघटनाच्या सर्वच मागण्या पूर्ण केल्या आहेत. पीड़ित कुटुंबाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.  आरोपीला फाशी होईपर्यंत मी जातीने लक्ष देईल. आम्ही तुमच्या आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. हा खटला जलतगती न्यायालयात सुरू करून जेष्ठ विधिज्ञ अँड. उज्वल निकम काम पाहणार आहेत.महिन्याच्या आत आरोपी विरुद्ध दोषापत्र न्यायालयात सादर होईल.खरच हे मुख्यमंत्री साहेबांचे विधान  स्वागत करण्याजोगेच आहे.
पीड़ित कुटुंबाची जात पात न बघता दलित बलात्कार प्रकरणीही हिच भूमिका सरकारने घेतली असती तर महाराष्ट्रात आज बलात्कारांचे प्रमाण झिरो असते आणि कोपर्डी सारखे अमानुष प्रकरण घडलेच नसते. कोपर्डीत घडलेली घटना अत्यंत वाईट आहे याबद्दल कुणाचेच दुमत नाही.आणि तितकीच दुर्दैवी घटना नेरुळ येथीलही आहे. तिथेही पीड़ित कुटुंब स्वप्नीलचा हत्येचा खटला हा जलतगती न्यायालयात सुरू करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहे.
त्यांचेही  म्हणणे ऐकून सरकार लवकरात लवकर दोषीना सजा देईल काय ? का येथेही स्वप्नीलची जात आडवी येईल !
संजय बनसोडे
घणसोली
9819444028

मंगळवार, १९ जुलै, २०१६

कोपर्डी बलात्कार पीड़ित मुलगी आमचीही बहिण.


कोपर्डी बलात्कार संदर्भात जो मराठा समाजातल्या सर्व संघटनांचा मोर्चा निघाला त्यात त्या मुलीला न्याय मागण्यापेक्षा जो  दलित समाजाला ॲट्रॉसिटी कायदा आहे त्याला बंद करण्याच्या मागण्या होत होत्या.
खरे तर सर्वच क्षेत्रातून या बलात्काराचा निषेध होत आहे.त्यात आबेडकरी समाजही आघाडीवर आहे.दोषीना फाशी झालीच पाहिजे असे आबेडकरी समाजाचे ही म्हणणे आहे. या मागणीसाठी जागोजागी मोर्चाही निघत आहे. असे असतांना सुद्धा हा बलात्कार जातिवादी कृत्य आहे असे म्हणणे चुकीची आहे. बलात्कार करणाऱ्या राक्षसी माणसांची कुठली जात नसते.  आम्ही या गोष्टीचा सुरवातीपासून निषेध करीत आलो व आरोपीला फाशी होईपर्यंत करीत राहीन. बलात्कार पीड़ित मुलगी आमचीही बहिण होती.
आंबेडकरी समाजा विरुद्ध विष ओकणाऱ्या संघटनानी त्वरित हे नाटके बंद करावीत व आरोपीला फाशी व्हावी व पुन्हा असे अमानुष कृत्य घडू नये यासाठी आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढावे.
संजय बनसोडे

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद ओळखा

पुणे करारावर सही करून एक अस्पृश्य आंबेडकर ,गांधीजीचे प्राण वाचवतात.
आणि त्याच गांधीजीला एक ब्राम्हण नथूराम गोळी घालून ठार मारतो.
काही ब्राम्हण जातिवाद,मनूवादाला खत पाणी घालतात आणि एक दाभोळकर ब्राम्हण फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य पुढे नेत अंधश्रद्धा मुक्त भारताचे स्वप्न बघतो.
मित्रांनो कोण  कोणत्या जातीचा आहे याला महत्व नाही तर कोण आंबेडकरी विचारांचा आहे आणि कोण ब्राम्हणवादी विचारांचा आहे हे ओळखा. कारण ब्राम्हणवादाला खतपाणी घालणारे पुष्कळ आपल्याही समाजात आहेत आणि ब्राम्हणवादाचा नायनाट करणारे पुष्कळ ब्राम्हण समाजात ही आहेत.
गौतम बुद्ध म्हणतात मी कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्मा यावे हे माझ्या हातात नव्हते पण मिळालेल्या जीवनात काय करायचे हे माझ्या हातात आहे.
डॉ बाबासाहेब ही म्हणाले होते मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते  पण हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही.
आज आपल्या देशात मेक इन इंडिया पेक्षा जास्त गरज जातीअंतची आहे. आज पुन्हा मनुस्मृती डोके वर करू पाहते. याचे ताजे उदाहरण म्हणजे जे लोकसभा आणि विधानसभेत वेद पुराणामधील गाडलेले देव आणि दैत्य यांचे विषय उकरून पुन्हा हज़ारों वर्षापूर्वीचे ग्रंथ आणि स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
आपला भारत देश जर धर्मनिरपेक्ष ठेवायचा असेल तर लोकसभेत, राज्यसभेत संविधानाविषयीच भाष्य व्हायला पाहिजे नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.
सर्वांना आपल्या जातीचा अभिमान आहे,पण तो घराच्या आतच बरा. बाहेर आपण सारे एक आहोत भारतवासी.
अखंड भारतातच आपले कल्याण आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य किती सत्य आहे याची आपल्याला आज प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
आज देशात जर कोणती लढाई लढण्याची गरज असेल तर ती जातीअंताची होय.
कारण जातीचा अंत झाल्याशिवाय कुणी स्वतःला भारतीय म्हणणार नाही.
जय भीम
संजय बनसोडे
घणसोली

गुरुवार, १४ जुलै, २०१६

अंतर जाती विवाह विषयी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मत

डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाज एकसंघ होण्यासाठी व जातिवाद नष्ट करण्यासाठी आपल्या अस्पृश्य अनुयायांना बोलत,जर अस्पृश्यतेचे निवारण करायचे असेल तर आपल्यात रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार झाला पाहिजे.आणि हे काय चमत्कार करून होणार नाही त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.  ज्या नवतरुणांना अंतरजातीय विवाह करायचा असेल त्यांना  प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे.
काही स्पृश्य लोक आंबेडकरांना बोलीत, तुम्ही आम्हांला बोलता की अस्पृश्यता पाळू नका पण तुमच्या अस्पृश्यातच अस्पृश्यता पाळतात त्याचे काय ? महार मांग, भंगी जातीला शिवत नाही. महार, मांग, चांभार हे एकमेकास तुच्छ लेखतात. तेंव्हा बाबासाहेब म्हणाले जी अस्पृश्यता अस्पृश्यात आहे ती तुमचीच देन आहे. बाबासाहेब आंबेडकर महार,मांग,चाभार जातीच्या अस्पृश्यांना नेहमी सांगत तुमच्यात रोटी बेटी व्यवहार व्हायला पाहिजे तेव्हांच तुम्ही एक व्हाल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व अस्पृश्य जातीला एक करण्याचा प्रयत्न करीत होते पण दुःखाची गोष्ट ही की, अद्याप आपण बौद्ध (पूर्वीचे महार ) अजून एक झालो नाही.आपल्यातच अजून एकी नाही. माझे मराठवाड्यात गाव आहे, तिथे मला बौद्धात तीन जाती आढळतात 1) आंधवन 2) लाडवन 3) सोमूस या जातीत अजून बेटी व्यवहार झाला नाही हे बघून आपल्याला आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्नं किती प्रमाणात पूर्ण करीत आहोत याचा प्रमेय होतो.अंतरजातीय विवाह तर दुरच पण आपण आपल्यात समानता आणण्यात ही असमर्थ ठरलो.
आंधवन स्वतःला दोघापेक्षा मोठा समजतो.लाडवन स्वतःला मोठा समजतो सोमूस म्हणतो मी सोमवंशीय आंबेडकर आमच्याच जातीचे. या तीनही जाती विखुरलेल्या आहेत या तीन जातीचा बौद्ध धम्मा व्यतिरिक्त दुसरा काहीही संबध नाही. या तीन जाती एक न होण्याचे दूसरे एक कारण आहे, एका गावात एकच जात आढळते.ज्या गावात आंधवन जातीचे बौद्ध आहेत त्यांच्या आजूबाजूच्या गावात ही आंधवन  जातीचे बौद्ध आढळतात. लाडवन आणि सोमूसाच्या बाबतीतही हेच चित्र दिसते.एकाच गावात तीन जाती आढळत नाहीत.त्यामुळे या तीन जातीला एक होण्याची आवश्यकता वाटलीच नसेल.
बाबासाहेबांनी जो जातीअंताचा विडा उचलला होता त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्यातल्या ह्या तीन जाती सर्वप्रथम नष्ट कराव्या लागतील आणि यांच्यात बेटी व्यवहार घडवून या तिन्ही जातीचा अंत करावा.
संजय बनसोडे 9819444028

"महार जातीच्या खोडावर बौद्ध धम्माचे कलम "

एका गावठी आंब्याच्या छोट्या झाडाला कलम करून त्याला कलमी करत. ही प्रतिक्रिया बघून मला लहानपणी नवल वाटे.  या कलमीमुळे त्या आंब्याचे    त्याचे स्वतःचे मूळ नष्ट होऊन तो आंबा एका दुसऱ्याच जातीत विलीन होत असे.त्याची अगोदरची  जात कितीही आंबट असली तरी त्याला कलम केल्यावर तो गोड व परिपूर्ण बने. ही कलमाची क्रिया करतांना त्याचे फक्त खोड, (मुळांपासून वरपर्यंत फांद्या सोडून ) शिल्लक ठेवून उर्वरित भाग छाटला जात असे आणि त्या उरलेल्या खोडावर दुसऱ्या गोड आंब्याचे कलम जोडल्या जात असे. कालांतराने ते कलम एकजीव होऊन त्या आंब्याला त्याच्या पूर्वीच्या जातीची फळे न येता कलमी गोड मधुर फळे येऊन त्याच्या पूर्वीच्या फळापेक्षा सात पट्टीने बाजारात महाग विकत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही 56 साली महार जातीच्या बुरसटलेल्या खोडावर  कलम  केले होते. "महार जातीच्या खोडावर बौद्ध धम्माचे कलम " 60 वर्षानंतर का होईना पण त्या कलम केलेला झाडाला बौद्ध धम्माचे गोड मधुर फळे येत आहेत. हे मोठ्या आनंदाने सांगावेसे वाटते.त्याची प्रचिती मला माझ्या घरातच आली.
माझी मुलगी "मनाली बनसोडे 2nd class " हीला एक नोटबुक हवी होती. मी ऑफीस वरून परत येताना  एका स्टेशनरी च्या दुकानातून विकत घेऊन तिला  दिली.ते नोटबुक बघून माझी  सात वर्षाची मुलगी माझ्यावर भडकली,
"पप्पा, आपण देवाला मानत नाही, मंग हे देवाचे चित्र असलेली नोटबुक का घेऊन आलात ?"
खरच, तिचे हे बोलले बघून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या  कलमेला आज बौद्ध धम्माची फळे येत आहेत.
60 वर्षानंतर का होईना पण कलम पूर्णपणे सक्सेस झाली,ती वाया गेली नाही.
    संजय बनसोडे 9819444028
घणसोली

बौद्ध धम्म. आपल्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला

बौद्ध धर्म जगात सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, पण तो आपल्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला त्यामुळे जसे आपण रोज बुद्ध वंदना घेतो तसेच रोज सकाळी घराबाहेर पडण्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या 22 प्रतिज्ञाही म्हणाव्यात व त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
मी जेंव्हा आपल्या बौद्ध बांधवाच्या घरात जातो तेंव्हा मला असे आढळते की, भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हॉलमधे व देवदेवतेचा साठा बेडरूम मधे असतो. मित्रांनो असे करने म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचा अपमान करने होय. एकतर आपण जगाला असे दाखवतो की, आम्हीं बौद्ध आहोत व आंबेडकर अनुयायी आहोत.पण बौद्ध तत्वाचे व बाबासाहेबांच्या विचारांचे अजिबात पालन करीत नाही.
मी जेंव्हा पण आपल्या बौद्ध बांधवाच्या घरात जातो व असे मिलावटी चित्र बघतो त्याला मी सरळ भाषत ठणकावून सांगतो, एकतर माझ्या बाबाची  व गौतम बुद्धाची प्रतिमा काढ किंवा देवाची प्रतिमा बाहेर काढ कारण एक गोष्ट सदैव लक्षात ठेव की, तुझ्या लहान मुलांवर व दुसऱ्या समाजाच्या लोकांवर तुझ्याकडून धम्माविषयी आणी बाबासाहेबाविषयी चुकीचा संदेश जात आहे.
भीम अनुयायी
संजय बनसोडे
घणसोली - नवी मुम्बई

बुधवार, १३ जुलै, २०१६

चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात )या पुस्तकांतून

शूद्र चोखामेळा l करी नामाचा सोहळा l
मी येतिहीन महार l पूर्वी निळाचा अवतार l
कृष्णनिंदा घडली होती l म्हणोनी महार जन्मप्राप्ती l
चोखा म्हणे विटाळ l आम्हा पूर्वीचे हे फळ l
    *संत चोखामेळा (कदम ग्रंथ अभंग पृ.11)
.
.
मराठी प्रदेशातील पूर्वाश्रमीचे महार "नागवंशीय "होते.मराठी प्रदेशाचे नाव महाराष्ट्र हे "महाराचे राष्ट्र " यावरून पडलेले आहे.या प्रश्नावर महाराष्ट्रातील विद्वानांनी व्यासंगीपणाने चर्चाही केलेली आहे व आपआपली मते ही मांडली आहेत.
श्रीकृष्णाने नागवंशीयांच्या, नागाच्या वस्तीस्थानाला आग लावून ते भस्मसात का केले ? (खांडववन )यातून श्रीकृष्ण व नागवंशीय यांच्यात संघर्ष होता हे दिसते.त्यातच या संघर्षाला पुढे हिंसक वळण लागलेले तत्कालीन परिस्थितीवरून दिसते."खांडववन" या प्रकरणावरून नागांनी सूड घेण्यासाठी शेवटी कृष्णावर बाणांचा, अस्त्राचा वापर केला.त्यात कृष्णाचा अंत झाला.(अशी आख्यायिका आहे )
त्यात चोखोबा महार (निळाचा अवतार ) म्हणजे मूळ नागवंशाचा. कृष्णाचा अंत नागवंशीयाकडून झाला.हिच कृष्णनिंदा झाली असे चोखोबाचे मत झाले.म्हणून महार जन्मप्राप्ती झाली असा चोखोबांनी विचार मांडला. याला ऐतिहासिक महत्व आहे.
           चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात )या पुस्तकांतून
.
.
#संजय बनसोडे#

मंगळवार, १२ जुलै, २०१६

हिंदू धर्म आपल्यासाठी भूतकाळ आहे पण बौद्ध धम्म आपल्यासाठी वर्तमान आणि भविष्यकाळ आहे

एक स्त्री असते तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला कंटाळून  तलाक ( फारकती ) घेतलेली असते.
आणि दुसऱ्या जोडीदारासोबत  स्वखुशीने विवाहबद्ध होते.ती पहिल्या संसारापेक्षा या संसारात दहापट सुखी असते. पहिल्या नवऱ्याकडून तिला मानसिक शारीरिक त्रास, हीन वागणूक शिव्यागाळच मिळाला. नवरा रोज दारू पिऊन हैदोस घालीत असे.सासू सासऱ्याचा रोज त्रास, तिला त्या घरात आपुलकीने कधी वागणूक मिळालीच नाही तीला त्या घरात कुणी त्या घराचा हिस्सा समजलेच नाही. ह्या साऱ्याच्या त्रासामुळे तिचे जीवन असंख्य शारीरिक आणि मानसिक वेदनाने ग्रासून गेले होते. यातून तिला मुक्तता हवी होती.तिचे हे दुःख बघून तिच्या बापाने तिला या दुखातून मुक्त केले, तलाक घेऊन.आणि एका सुशिक्षित घराण्यात पुन्हां तिचे थाटामाटात लग्न लावून दिले.
आता ती खूप सुखी आहे. तिची सासू तिला तिच्या आईपेक्षाही जास्त प्रेम करीत होती. सासरा बापाप्रमाणे वागवत होता. काम करण्यासाठी घरात नौकर चाकर होते. नवराही खूप प्रेमाळू तिला कशाचीही कमी नव्हती.सर्वप्रकारचे सुख,स्वातंत्र्य असूनही ती मात्र या संसारात रमून सर्वासोबत सुखाने नांदन्यापेक्षा ती रोज पहिल्या नवऱ्याच्या दारी जावून भांडत असे.त्यांना दोष देत असे आणि आपल्या आताच्या सासू सासऱ्याचे उदाहरण देऊन त्यांना छळित असे. जेंव्हा ती घरी येत असे तेंव्हाही ती अगोदरच्या नवऱ्याचे अन् सासू सासऱ्याच्या  गाऱ्हाण्याचा पाढाच रोज गिरवत असे. यामुळे झाले असे की, नवीन घरातले नियम, नवऱ्याला काय हवं आहे सासू सासऱ्याला काय हवं आहे.आपले नवीन नातेवईक किती आहेत कोण आहेत कुठे आहे याचे तिला काहीच माहीत नव्हते व माहीत होण्यासाठी ती प्रयत्नही करत नव्हती. ती दररोज आपल्या अगोदरच्या नवऱ्याला दोष देण्यातच व्यस्त असे. बिचारे सासू सासरे मात्र वाट बघत होते ती कधी अगोदरच्या संसाराला विसरून आम्हांला आपलं समजेल .........
मित्रांनो कदाचित आपणही त्या स्त्री सारखे तर करत नाही ना..... !
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली.आपण मात्र बौद्ध धम्माचा प्रचार अन् प्रसार करण्यापेक्षा हिंदू आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करण्यात आपल्या पिढ्या गमावत आहोत.
तुम्ही बोलाल बाबासाहेबांनीही हिंदू धर्मावर देवांवर ब्राह्मणावर टीका केली आम्ही त्यांचे अनुयायी मंग आम्ही का नको ?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर ब्राह्मणावर टीका केली तो त्यांचा हक्क होता. कारण ते तेंव्हा हिंदू होते. तेंव्हा ते हिंदु धर्माच्याअनिष्ट  रुढी परंपरा नष्ट होण्यासाठी झगडत होते आणि यात व्यत्यय आणणार्यावर ते  टिकास्त्र उचलीत होते.पण जेंव्हा त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेंव्हा त्यांनी हिंदू धर्माशी असलेले सारे नाते तोडले.त्यांनी सरळ आपल्या 22 प्रतिज्ञेत सांगितले की मी हिंदू धर्माला मानणार् नाही.मी ब्रह्मा विष्णुला मानणार नाही मी राम कृष्णाला मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म जगाला सांगण्यापेक्षा जो धर्म आपला नाही जो देव आपला नाही त्यावर टीका करण्यात काय उपयोग.बाबासाहेब हिंदू असतांना त्यांना सतत उच्चवर्णीयांनी छेळले त्यांनीही वेळोवेळी आपल्या झुंजार लेखणीतून त्यांना जशास तसे उत्तर दिले. मित्रांनो ब्राह्मण  हिंदू धर्म आपल्यासाठी भूतकाळ आहे पण बौद्ध धम्म आपल्यासाठी वर्तमान आणि भविष्यकाळ आहे.जेवढ्या लवकर आपण बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या समाजात त्याचा प्रचार आणि प्रसार करणार नाही तोपर्यंत आपला समाज प्रगतीच्या मार्गवर जाणार नाही.
आधीच वेळ खूप झाला आहे आतातरी सुधरा आणि बौद्ध धम्माचे कार्य हाती घ्या.
जय भीम
संजय बनसोडे
घणसोली
नवी मुम्बई,

रविवार, १० जुलै, २०१६

रक्तपात केला त्यांनी रक्तपात केला


धर्माचा हा चेला जिहादसाठी मेला
रक्तपात केला त्यांनी रक्तपात केला !!
.
स्वार्थापायी धर्माला कीड़ लागली
त्या कीड़मधे सडण्या येथे भीड़ लागली !
.
या माणसाने माणसाचाच घात केला
रक्तपात केला त्यांनी रक्तपात केला !!
.
माणसे सारे एक तरी,हे वेषाला भाळले
धर्माच्या वैऱ्याला त्यांने जिवंत जाळले !
.
किड्या मुंगी सारखा माणसाचा नाश केला
रक्तपात केला त्यांनी रक्तपात केला !!
.
भर रस्त्यावर वैऱ्या, हे चिरू लागले
जिहाद करण्या सारीकडे फिरू लागले !
.
ना दिसे कुणी संजया, माणुसकीचा भुकेला
रक्तपात केला त्याने रक्तपात केला !!
.
कवी संजय बनसोडे

तुझ्या चिरेबंदी धर्माला मी खिंडार पाडले

तुझ्या थोतांड ग्रंथाचे मी धिंडार काढले
तुझ्या चिरेबंदी धर्माला मी खिंडार पाडले !
.

धर्मात किती जाती जातीत पोटजाती
दगडाचा देव तुझा माणसाची नोट खाती !
.

ते अंधविश्वास फैलावणारे मी भंडार सोडले
तुझ्या चिरेबंदी धर्माला मी खिंडार पाडले !
.

तु जातीत जातीचा करतोस किती बाट
तु माणसाच्या माणुसकीचा केलास नायनाट !
.

तुझ्या जातिवादाने आज, अत्याचार वाढले
तुझ्या चिरेबंदी धर्माला मी खिंडार पाडले !
.

तुझ्या धर्माचे ठेकेदार फेकती मायाजाळं
त्यांनी धर्मविष पाजले,तुटताच तुझी नाळं !
.

तुला बनवून धर्मोन्माद धर्मदायात ओढले
तुझ्या चिरेबंदी धर्माला मी खिंडार पाडले !..
.

संजय बनसोडे

गुरुवार, ७ जुलै, २०१६

आजचा समाज आणि आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज

आजचा समाज आणि आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज
जय भीम मित्रांनो
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबेडकरी कार्याच्या नेत्रुत्वाचा धुरा दादासाहेब गायकवाड साहेबांच्या खांद्यावर आला होता व ते यशस्वीरित्या पार ही पाडत होते.
आंबेडकरी समाजातील शिक्षित वर्गही त्याच वेळी समाजाचा लिडर होवू पाहत होता. आणि जनतेला सांगत होता आम्हींच खरे भिमाचे वारसदार, ज्या शिकलेल्या लोकांनी बाबासाहेब हयात असतांना धोका दिला तोच वर्ग  नंतर बाबासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवत होते. जो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी दलित समाजाला न्याय देण्यासाठी खोलला होता त्याच पक्षाला आता वेगवेगळे फाटे फुटत होते त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कंसात  आपआपली नाव टाकल्या जात होती आणि समाजाला मूळ समाजकार्याच्या हेतुतून दूर फेकत होती.
आज आपण बघितले तर एकाच शहरात दहा ते पंधरा आंबेडकरी पक्ष उदयाला आलेली दिसतात.आणि स्वतःच्या फायद्यानुसार या ना त्या मोठ्या पक्षाला चिपकलेले दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी बघीतलेल्या स्वप्नातला समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी कुणीही लढताना दिसत नाही. याउलट स्वतःच्या पक्षाची इमेज राखण्यासाठी दुसऱ्या आंबेडकरी पक्षावर हल्ला चढवला जात आहे.
बाबासाहेबांनी आपल्याला पहिला संदेश दिला होता "शिका " आम्ही शिकतोय, पण स्वतःसाठी समाजासाठी नाही. एकदा शिकून आरक्षणाचा फायदा घेऊन सरकारी नोकरीत रुजू झाल्यावर आम्ही समाजाकडे ढुंकूनही बघत नाही. मंग आम्हांला आंबेडकरही नको आणि तो समाजही नको. नंतर आम्ही मध्यम वर्गामधे मिळुन स्वतः पुढे हिंदू नावाचा शिक्का लावून एक नवीन जिंदगी जगतो. त्यात ना समाज येत ना आंबेडकर येत. जो पक्ष बंद लिफाफ्या मधे सर्वात जास्त पैसे देईल त्यालाच आम्ही मतदान करतो. आम्ही जिथे राहतो तिथे कुठे आजुबाजुला बौद्ध विहार आहे का नाही , असेल तर तिथे जाण्याचीही आम्हांला गरज वाटत नाही. धम्मदान तर दुरची गोष्ट आहे. मात्र गणपती उत्सव देवी उत्सव आणि इतर सणाला आवर्जून देणगी देतो.
बाबासाहेबांनी दुसरा संदेश दिला होता "संघटीत व्हा "
गल्ली बोळ्या मधे रोज नवनवीन पक्ष बाबासाहेबांच्या नावावर सुरू होत आहेत. या गल्लीतला मनसे सोबत तर दुसऱ्या गल्लीतला शिवसेने सोबत तर तिसऱ्या गल्लीतला भाजप सोबत तर चौथ्या गल्लीतला कॉँग्रेस सोबत दिसतात.
भविष्यात शिवसेना आणि मनसे एक होतील पण हे कदापि होणार नाहीत. पण या सर्व पक्षांचे कार्यही बाबासाहेबांच्या विचारांवर हवे ना ! तेही नाही.
यांचे कार्य तुंम्हीही येणाऱ्या दिवसात बघाल,  दही हंडी,  नीळी हंडी ,  गणेशउत्सव असे त्यांचे कार्य, जाती सोबत नाही पण इतर जाती सोबत हे संघटीत नक्की झाले.
समाजातील मध्यम आणि उच्च वर्गीयांना तर समाजाचे आणि आंबेडकरी चळवळीचे काहीही देणेघेणे नाही. कोण मरतय, कोण लढतय, कोण आंदोलन करतय कुठे विटंबना झाली हे महाशय घरात आरामात टीव्हीवर बघतात आणि आपल्याच समाजाची मज़ाक उडवतात.
बाबासाहेबांनी तिसरा संदेश दिला होता "संघर्ष करा "
असा विखुरलेला समाज आणि विहारांचे तोंडही न पाहणारा समाज काय संघर्ष करील ?
अनोळखी व्यक्तीने कधी याला जात विचारली तर लपवणारा काय समाजासाठी संघर्ष करील ?
समाजात वावरताना मुम्बई सारख्या मोठ्या आधुनिक शहरात खूप कमी लोकांची, समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्यात तळमळ बघितली. खूपच कमी लोक आंबेडकरी चळवळीमधे सहभाग घेण्यासाठी उत्सुक दिसतात.
बाकीची 1BHK /2BHK  मधे राहणारी समाजाच्या आणि चळवळीच्या लांबच राहण्यात धन्यता मानतात. मित्रांनो हे समाजातील चित्र बदलण्यासाठी आपल्यालाच पुढे यावे लागेल. त्यामुळे आतापासुनच आंबेडकरी कार्याला सुरवात करा

जय भीम जय भारत
संजय बनसोडे -9819444028

मरेपर्यंत जळीन परी समाज हा उजळीन


भीमक्रांतीची  ज्योतं, झालो मी त्याची वातं
न्याय हक्कासाठी लढीन
मरेपर्यंत जळीन परी समाज हा उजळीन !!
.
पेटून रात दिस त्या अंधाराशी भीडलो
आले वादळ वारे तरी वैऱ्यांशी लढलो !
.
स्वप्न पूर्ण करण्या 22 प्रतिज्ञेकडे वळीन
मरेपर्यंत जळीन परी समाज हा उजळीन !!
.
पेटली प्रकाशासाठी ही भीम सूर्याची आग
विझवाल जर आगीला,होईल तुमचीच राख !
.
क्रांतीसाठी येथे एकेक भीमरत्न न्याहळीन
मरेपर्यंत जळीन परी समाज हा उजळीन !!
.
तू केले आम्हां माणूस तुझे थोर उपकार
रक्ताचेच काही येथे झाले आज गद्दार !
.
होऊन आग त्याला तुझा भीमसैनिक जाळिल
मरेपर्यंत जळीन परी समाज हा उजळीन !!.
.
भीमकवी संजय बनसोडे

मी विद्रोह नावाचं शस्त्र हातात घेतलं

## मी विद्रोह नावाचं शस्त्र हातात घेतलं 🖋✒##
अंधाराने बरबटलेल्या रात्रीत
मी चाललोय
श्मशानात
मेलेल्या मुडद्यांना जागे करायला.
काही अक्कल शून्य
समजतात मला अधम.
तरीही मी अनभिज्ञ रस्त्यातून
चाललो
श्मशाने तुडवित.
दिसेल त्या मढ्यावर
मारतो फटकारे.
आणि
दाखवतो त्यांना उद्याचा सूर्य
त्यांच्या अस्तित्वाला नष्ट करणारा.
पण,
जागतील ते मुडदे कसले ?
मीही थकलो नाही.
त्यांना सतत डिचवत राहिलो
कारण,
मी विद्रोह नावाचं शस्त्र हातात घेतलं.
संजय बनसोडे

बुधवार, ६ जुलै, २०१६

आम्ही कोण,बौद्ध की महार ?


बौद्ध धम्म स्वीकारून आज आपल्याला  जवळपास साठ वर्ष झाले. या साठ वर्षात आमची एक पीढ़ी मातीत गेली. 1956 साली ज्याचा जन्म झाला आज तोही मोडकळीस आला.
मानवाच्या जीवनात साठ वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्यच.
मंग माझा प्रश्न तमाम माझ्या बौद्ध बांधवांना आहे,
या साठ वर्षात आपण बौद्ध धम्म आत्मसात केला का ?
याचे उत्तर मला "नाही "हेच मिळेल.
पण, का नाही ?
बौद्ध धम्म आपल्या मेंदूपर्यंत पोचवण्या नेमके कमी कोण पडले ?
जर तुमचे उत्तर "हो " आहे तर, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या !
का आपल्यावर उच्च जातीच्या हिंदू  लोकांचे आजही हल्ले होतात ?
का आपल्याला आजही दलितच संबोधतात ?
का आपल्याला आजही काही उच्चवर्णी  महार म्हणून हिणवतात ?
जर एखाद्या दलित हिंदू व्यक्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्यावर आपल्यासारखा अन्याय होतो का ?
मुळीच नाही !
मंग आपल्यावरच का ?
जर एखाद्यानी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तो तन मन धनाने तो धर्म अंगी कारतो.त्याच्या गळ्यात, खिशात, घरात, दारात त्या त्या धर्मगुरुचेच फोटो दिसतील. धर्मांतर केल्यानंतर त्यानी अगोदरच्या धर्माला पूर्णतः सोडलेले असते.
जर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर तो नियमित मस्ज़िदला जाणार त्या धर्माचे काटेकोरपणे पालन करणार.
जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर तो नियमित चर्च मधे जाऊन प्रार्थना करणार धर्माचे पालन करणार.
मंग मला प्रश्न असा उद्भवतोआपण धर्मांतर करून बौद्ध झालो. 
काय आपण बौद्ध तत्वाचे पालन करतो ?
बौद्ध धम्मासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करतो ?
1956 साली आपण हिंदू धर्म जरूर सोडला पण हिंदू धर्माचे देव, सण,चालीरीती मात्र सोडल्या नाही.
ज्या मंदिरात आपल्याला प्रवेश नाही त्या मंदिरात आपण बाहेरून हात जोडून दर्शन घेतो पण विहारात कधी ढुंकूनही बघत नाही. 
कुणी आपल्याला कुलदैवत विचारले तर आपण खंडोबा सांगतो.
दसरा,दिवाळी,होळी,पंचमी,रक्षाबंधन सारे सण चुकता धुमधडाक्यात साजरे करतो.
शिर्डी शेगांवच्या  देवस्थानात जास्त आम्हींच गर्दी करतो.
मंग आम्ही कोण ?
बौद्ध की महार ?
जर आपण बौद्ध धम्माचे तत्व पाळता हिंदू धर्माचेच तत्व पाळत असणार तर आपल्याला उच्च वर्णी हिंदू दिन दलित मागासलेला महार समजणारच आपल्यावर पूर्वीसारखाच अन्याय अत्याचार करणार.
हिंदू धर्मातील कित्येकानी पूर्वी मुस्लिम ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मंग त्यांच्यावर का उच्च हिंदू अन्याय अत्याचार करीत नाहीत.
कारण ते आता हिंदू नाहीच !त्यांचा देव वेगळा आहे.धर्म वेगळा आहे. सण वेगळा आहे.कुलदैवत वेगळे आहे.
जर ते हिंदू नाहीत तर उच्च नीच लेखण्याचे काहीएक कारण नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, आपल्या समाजाला नुसते  नामांतर करून काहीही फायदा होणार नाही. आपल्याला जर शूद्र नावाची घाण आपल्यातून उखाडून फेकायची असेल तर आपल्याला धर्मांतर शिवाय गत्यंतर नाही.
ते आपल्या भाषणात हिंदूतून धर्मांतर केलेल्या काही जातीचे पुरावेही दाखवत होते.एका शूद्र जातीतील जेंव्हा ते हिंदू होते तेंव्हा त्यांना गावातल्या विहीरीत सवर्णा बरोबर पाणी भरण्या मनाई होती पण त्यानी धर्मांतर केल्यावर त्यांना आपोआप त्या विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार मिळाला.
ही आहे धर्मांतराची ताकत. मंग ती अध्यापही आपल्याला का लागू झाली नाही. आजही खेड्यापाड्यात आमच्या बांधवाना गावात उच्च वर्णाच्या विहीरीवर पाणी भरण्यास मनाई आहे.
आजही आम्हांला गावात खालचा दर्जा आहे.
याचे कारण एकच, आपण बौद्ध धम्म स्वीकारला पण अंगीकारला नाही.
त्यामुळे सवर्णाला आजही आम्ही महारच दिसतो.
जो पर्यंत तुम्ही बौद्ध धम्माचे तत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अंगीकारत नाही. तो पर्यंत तुम्हांला बौद्ध म्हणून सांगण्याचा अधिकारच नाही.
जय भीम
संजय बनसोडे 
मनोगत .....................✒
 

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...