शुक्रवार, १ जुलै, २०१६


"हिंदू धर्म आणि बाबासाहेब "
हिंदू धर्माचा खरा सुधारक कुणी असेल तर तो माझ्या मते डॉ बाबासाहेब आंबेडकरच !
1920 पासून ते 1935 पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्म सुधारुन माणसांच्या जीवनाला परिपूर्ण व्हावा यासाठी झगडत होते. त्यांचे 1935 पूर्वीचे कार्य हे स्पृश्य समाजाबरोबर समान हक्कासंबंधीचे होते. बाबासाहेबांना हिंदू धर्माची चीड नव्हती. बाबासाहेबांना हिंदू धर्मात हजारो वर्षापासून अस्पृश्यांना गुलाम बनवलेल्या चातुर्वर्णाची चीड होती. त्यांना जी हिंदू धर्मात असमानता आहे त्याची चीड होती.जी हिंदू धर्मात उच्च नीचता आहे त्याची बाबासाहेबांना चीड होती.
त्यांच्या मते हिंदू समाज हा पायऱ्या नसलेल्या इमारती प्रमाणे आहे. खालचा मनुष्य कितीही लायक असला तरी तो वर जाऊ शकत नाही आणि वरचा मनुष्य कितीही नालायक असला तरी तो खाली येऊ  शकत नाही या असमानतेलाच बाबासाहेबांनी सुरुंग लावायचे काम केले.
माणूस असूनही ज्यांना हिंदू धर्मात  माणसाचा अधिकार नाही तो मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले प्राण पणाला लावून होतील तितके प्रयत्न केले. हे प्रयत्न करतांना बाबासाहेबांना सतत स्पृश्याच्या शिव्या आणि त्यांच्या अनुयायांना मारच खावा लागला.
बाबासाहेब स्पृश्य हिंदूला समान अधिकार मागत होते पण स्पृश्य हिंदू त्या बदल्यात बाबासाहेबांना हिंदूद्वेष्टा, देशद्रोही, इंग्रजाचा हस्तक म्हणून हिणवत होते. पण अशा अकलशून्य लोकांचे बाबासाहेबांनी कधी मनावर घेतले नाही. ते सतत आपले कार्य करीत राहिले.अस्पृश्यांच्या हक्कासाठी झटत राहिले.पण स्पृश्य हिंदूना त्यांची थोडीही दया आली नाही त्यांच्यात सूतभरही फरक झाला नाही.
बाबासाहेब  नेहमी म्हणत, माझे देश प्रेम एक ना एक दिवस साऱ्या देशाला कळेल.
जळगावला एका सभेसाठी बाबासाहेबांना जायाचे होते. स्टेशन पासून अस्पृश्यांच्या वस्तीपर्यंत बाबासाहेबांना घेऊन जाण्यास टांग्यावाल्यांने इनकार केला. शेवटी एका अस्पृश्य व्यक्तीने टांगा चालवला.त्याला टांगा हाकण्याची सवय नसल्यामुळे घोडा बिथरला आणि टांगा पलटी होऊन बाबासाहेबांच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे कित्येक दिवस बाबासाहेब बाजेवरच होते.
चवदार सत्याग्रहाच्या वेळी कित्येक अस्पृश्यांना स्पृश्य हिंदूंनी दगड, काठ्याने जबर मारहाण केली, त्यांना रक्तबंबाळ केले आणि ठणकावून सांगितले पुन्हा हक्क मागितला तर लाठ्या काठ्याच मिळतील.
बाबासाहेब एकेदिवशी महाडला काही कामानिमित्त गेले होते.पावसाळ्याचे दिवस होते  नदीला पूर आला होता. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच थांबावे लागले. जवळपास अस्पृश्यांचे घरे नसल्यामुळे त्यांना उपाशीच रहावे लागले स्पृश्यांने त्यांना अन्न तर दुरच, पाणी सुध्दा दिले नाही. तेव्हा घरी आल्यावर बाबासाहेब ढसा ढसा रडत होते. बाबासाहेबांचे मन सतत त्यांना बोलत होते, मी अस्पृश्य जातीत जन्मा आलो हा गुन्हा आहे काय ?
मी हिंदू धर्माचा असूनसुध्दा मला     हिंदू धर्मात समानतेची वागणूक मिळत नाही मी शिकलेला असूनही केवळ अस्पृश्य आहे म्हणून मला या हिंदू धर्मात कवडीचीही किंमत नाही.
हिंदू धर्माचा आम्ही हिस्सा असूनही आम्हांला चांगले कपड़े तांब्या पितळेची भाडे वापरायलाही परवानगी नाही. जो धर्म आमच्यावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार करीत आला त्या धर्मात राहून काय उपयोग ?
मंदिर प्रवेशासाठी सतत पाच वर्ष प्रयत्न करूनही स्पृश्यात काहीच फरक पडला नाही या आंदोलनासाठी अस्पृश्याचा पैसा आणि ताकत दोन्हीही वाया गेली पण सनातन्याचा आत्मोद्धार झाला नाही. मंदिरासमोर मंदिरप्रवेशासाठी अस्पृश्याने सतत पाच वर्ष डोके फोडले, ते बघून त्या दगडालाही दया आली असेल पण दगडाचे काळीज असणाऱ्या त्या स्पृश्य हिंदूंना त्याचे काहीच वाटले नाही यात नवल काय ?
आपल्या  आंदोलनामुळे स्पृश्य हिंदूंत काहीही बदल होत नाही हे बघून बाबासाहेबांनी 13-आँक्टोबर -1935 साली भीम गर्जना केली आणि अस्पृश्य समाजाला ठणकावून सांगितले, ज्या धर्मात आपल्याला कवडीची ही किंमत नाही, जो धर्म आपल्याला आपला मानीतच नाही, ज्या धर्मात आपला गुराढोरा पेक्षाही अमानुष छळ होतो त्या धर्मात राहून काय उपयोग ?
साऱ्या अस्पृश्यांना त्यांने सांगितले, आपल्या हक्कासाठी स्पृश्य हिंदू सोबत झगडने आता बंद करा. आता आपल्याला धर्मांतर व्यतिरिक्त गत्यंतर नाही. हिंदू धर्मात राहून आपले कल्याण होणार  नाही. त्यामुळे मी आज तुमच्या समक्ष शपथ घेतो , "मी जरी हिंदू म्हणून जन्मा आलो तरी हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही "
जर बाबासाहेबांना हिंदूंना धडा शिकवायचा असता तर त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन सारखा परकीय धर्मही स्वीकारला असता. पण त्यांनी याच मातीतला व आपल्या पूर्वज्यांचा मानवकल्याणासाठी परिपूर्ण असलेला बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपले देशप्रेम जगाला दाखवले.
संजय बनसोडे
9819444028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...